Uday Samant On Ravindra Dhangekar : विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला फारसं यश मिळालं नाही. आता आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेससह सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु आहे. मात्र, असं असताना काँग्रेसमध्ये काही नेते नाराज असल्याची चर्चा आहे. अशातच काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांचं एक व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्स चर्चेत आलं आहे. रवींद्र धंगेकर यांनी ठेवलेल्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्‍समधील फोटोत त्यांनी गळ्यात भगवं उपरणं परिधान केलेलं आहे. त्यामुळे रवींद्र धंगेकर यांच्या मनात नेमकं काय चाललंय? याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

उदय सामंत काय म्हणाले?

रवींद्र धंगेकर यांच्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्‍सबाबत बोलताना शिवसेना (शिंदे) पक्षाचे नेते तथा मंत्री उदय सामंत यांनी एक सूचक विधान केलं. मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं की, “मला असं वाटतं की रवींद्र धंगेकरांनी गळ्यात जर भगवं उपरणं ठेवलं असेल आणि त्यावर जर भविष्यात धनुष्यबाण आला तर आम्हाला सर्वांना आनंदच होईल.” दरम्यान, रवींद्र धंगेकर यांच्या स्टेट्‍सबाबत उदय सामंत यांनी ही सूचक प्रतिक्रिया दिल्यामुळे पुण्यात काँग्रेसला धक्का बसणार असल्याची चर्चा रंगली आहे.

रवींद्र धंगेकरांच्या स्टेट्‍समध्ये काय?

काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी त्यांच्या स्टेट्सला गळ्यात भगवं उपरणं घातलेला एक फोटो ठेवला आहे. तसेच त्या फोटोवर स्टेट्सला ‘तेरे क़दमों के तले मिट्टी भी सोना बन गयी, जर हुआ दुश्मन जहाँ शमशीर तेरी तन गयी…’ हे गाणे ठेवले आहे. त्यामुळे रवींद्र धंगेकर यांच्या स्टेट्सची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. तसेच रवींद्र धंगेकर हे काँग्रेस सोडणार का? याबाबत आता अनेकांनी तर्कवितर्क लावण्यास सुरुवात केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काही दिवसांपूर्वी धंगेकरांनी घेतली होती शिंदेंची भेट

माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत भेट घेतली होती. रवींद्र धंगेकर यांनी अचानक घेतलेल्या या भेटीमुळे चर्चांना उधाण आलं होतं. मात्र, त्यानंतर या भेटीबाबत स्पष्टीकरण देताना आपण वैयक्तिक कामाच्या संदर्भात भेट घेतल्याचं स्पष्टीकरण रवींद्र धंगेकर यांनी दिलं होतं. धंगेकर म्हणाले होते की, “माझ्या वैयक्तिक कामासाठी मी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर मी त्यांना माझ्या वैयक्तिक कामाचं स्वरुप सांगितलं, तेव्हा ते काम करून देतो बोलले. त्यांच्याकडे काम असल्यामुळे मला त्यांना भेटण्याची गरज पडली”, असं रविंद्र धंगेकर म्हणाले होते.