Ravindra Dhangekar on Pune Jain Boarding House Land Scam : पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या जमिनीचा बेकायदेशीर व्यवहार अखेर रद्द होत आहे. या व्यवहाराविरोधात लढणारे शिवसेनेचे (शिंदे) नेते व माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी केंद्रीय राज्यमंत्री तथा भाजपा नेते मुरलीधर मोहोळ यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले. काही कथित पुरावे देखील सादर केले. त्यानंतर मुरलीधर मोहोळ यांच्या कारभारावर शंका उपस्थित केली गेली. मात्र, अचानक धंगेकर यांनी मोहोळ यांचा उल्लेख करणं टाळलं. त्यांच्यावर टीका करणं बंद केलं. परिणामी धंगेकर यांच्यावर कोणाचा दबाव आहे का? असा प्रश्न उपस्थित केला गेला. मात्र, आता धंगेकर यांनी स्पष्ट केलं की त्यांच्यावर कोणाचाही दबाव नाही.
रवींद्र धंगेकर यांनी सांगितलं की त्यांच्या पक्षाच्या (शिवसेना) प्रमुखांनी म्हणजेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना मित्रपक्षांवर टीका न करण्यास सांगितलं होतं. मात्र, पुणेकरांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवत राहा अशा सूचनाही केल्या आहेत.
पक्षप्रवेशापासूनच उपमुख्यमंत्र्यांचा मला पाठिंबा : धंगेकर
रवींद्र धंगेकर म्हणाले, “पुणेकरांची भूमिका हीच माझी भूमिका आहे. मी जो काही लढा देत आहे. त्या लढ्यात आमच्या पक्षाच्या प्रमुखांनी मला कायम सहकार्य केलं आहे. त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो. मी पक्षप्रवेश केल्यापासून आमचे नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे माझ्या पाठिशी आहेत. मी खरं बोलतो म्हणून ते मला पाठिंबा देतात. त्यांनी मला सांगितलं की तू मित्रपक्षांवर काही बोलायचं नाही. परंतु, पुण्यातील गुन्हेगारीविरोधात, पुणेकरांच्या प्रश्नांसाठी लढत राहा.”
“मी विरोधी पक्षांविरोधात बोलत नाही”
“पुण्यात बिल्डर लॉबी ज्या पद्धतीने काम करतेय, त्यांच्या अवतीभोवती राजकारणी लोक आहेत. राजकीय पदांची शक्ती वापरून पुणेकरांसमोर अडचणी निर्माण केल्या जात आहेत. मात्र, अन्याय करणाऱ्यांविरोधात बोलायला मला कोणी अडवलेलं नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री उदय सामंत माझ्या पाठिशी उभे आहेत. मी कधी कुठल्याही विरोधी पक्षाविरोधात बोलत नाही. मी केवळ एका प्रवृत्तीविरोधात बोलतो.”
माजी आमदार धंगेकर म्हणाले, “बिल्डरांनी पुण्यात सर्वसामान्यांचं जगणं अवघड केलं आहे. पुण्यात आपली नजर जाईल तिकडे पुढारी, मंत्री व बिल्डर लॉबीने वेढा घातला आहे. सगळीकडे भीतीचं वातावरण आहे. याविषयी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. यात लक्ष घालण्याची विनंती केली आहे. काही पुढारी व श्रीमंतांमध्ये सर्वसामान्यांना त्रास देण्याची प्रवृत्ती वाढली आहे.”
