विदर्भाच्या शोषणातून महाराष्ट्राचा झगमगाट सुरू आहे. कोळसा आमच्याकडे मात्र विज मुंबईला, कापूस आमचा मात्र गिरण्या मुंबईत, नद्या, धरणे विदर्भात विजेचे उत्पादन मात्र मुंबईत, हे आता चालणार नाही. अजूनही वेळ गेली नाही, ज्या भाजपाने वेगळ्या विदर्भाच्या नावावर सत्ता काबीज केली. त्यांनी आतातरी विदर्भ वेगळा करावा, अन्यथा जनता आता तुम्हाला विदर्भातून हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा जय विदर्भ पार्टीचे मुख्य संयोजक राम नेवले यांनी दिला.

स्वतंत्र विदर्भ आंदोलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच स्वतंत्र विदर्भ आंदोलन समितीचे विलीनीकरण करून जय विदर्भ पार्टी स्थापन केली आहे. या सदंर्भात माहिती देण्यासाठी  राम नेवले  बुलडाणा येथे आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना नेवले म्हणाले की, गेल्या अनेक वर्षापासून आम्ही वेगळया विदर्भासाठी संघर्ष करीत आहोत. आमचा लढा सुरूचं आहे. मात्र आता स्वतंत्र विदर्भ आंदोलन समिती बरोबरच राजकीय पक्ष काढून आम्ही आमची ताकद दाखवून देणार आहोत.

लाचारी खपवून घेतल्या जाणार नाही

तसेच येणाऱ्या महानगर पालिका, नगर पालिका व जिल्हा परिषदांच्या निवडणुका जय विदर्भ पार्टी अंतर्गत लढवून एक नवा पर्याय उभा करणार असल्याचे नवले म्हणाले. “विदर्भात जल, जंगल व मोठया प्रमाणावर खनिज उपलब्ध आहे. इथली माती सोनं पिकवते. मात्र आतापर्यंत आमच्या शोषणातून पश्चिम महाराष्ट्राचा विकास झाला आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे सभागृहात मी वेगळा विदर्भ देणार नाही अशी गर्जणा करतात, तेव्हा आमच्या विदर्भातील ६२ आमदार खाली मान घालून बसतात. यावर एकाचीही ब्र शब्द बोलण्याची ताकद होत नाही. याला कारण हे सर्व आमदार लाचार आहेत. आता ही लाचारी खपवून घेतल्या जाणार नाही,”, असे राम नेवले म्हणाले. 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिवसेना स्वतंत्र विदर्भ राज्याच्या विरोधात

“शिवसेना स्वतंत्र विदर्भ राज्याच्या विरोधात आहे. यांना मराठी भाषेच्या नावावर विदर्भाला लुटायचं आहे. मराठी भाषीकांचे दोन राज्य झाले तर बिघडते कुठ?, हिंदी भाषीकांचे १२ राज्य आहेत. तेलगू, बंगाली  भाषीकांचे देखील प्रत्येकी दोन राज्य आहेत. मग मराठी भाषीकांचे दोन राज्य झाले तर कुठ बिघडते. यांच्या घरामध्ये शिवसेना, मनसे दोन पक्ष चालू शकतात. मग दोन राज्य का चालत नाहीत”, असा प्रश्न उपाध्यक्षा रंजना मामर्डे यांनी उपस्थित केला.