‘ग्लोबल टीचर’ रणजितसिंह डिसले यांची अपेक्षा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एजाजहुसेन मुजावर, लोकसत्ता

सोलापूर : जगाने मोठे म्हटल्यानंतर आपणही मोठे म्हणण्याची भारतीयांची मानसिकता हे आपले अपयश आहे. शिक्षकांचे महत्त्व, त्यांचे काम, त्यांचा सामाजिक दर्जा यांचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. शिक्षकांची गुणग्राहकता आणि योगदानाला मान्यता मिळायला हवी, अशी अपेक्षा रणजितसिंह डिसले यांनी व्यक्त केली.

युनेस्को आणि लंडनस्थित ‘वार्की फाऊंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने दिल्या जाणाऱ्या ‘ग्लोबल टीचर’ पुरस्कारासाठी सोलापूर जिल्ह्य़ातील परितेवाडी येथील जिल्हा परिषद शिक्षक डिसले यांची निवड झाल्यानंतर त्यांच्या निवासस्थानी अभिनंदनासाठी दिवसभर मान्यवरांची रीघ लागली आहे. जगभरातून भ्रमणध्वनीही सतत खणखणत आहेत. प्रत्येकाकडून अभिनंदन स्वीकारताना संपूर्ण डिसले कुटुंबीय भारावले आहे. हा कौतुकवर्षांव स्वीकारतानाच डिसले गुरुजी ‘लोकसत्ता’शी बोलत होते.

डिसले यांनी भारतीय शिक्षण व शिक्षकांविषयी मते खुल्या मनाने मांडली. भारतीय शिक्षण पद्धतीत तंत्रज्ञानाचा वापर वाढायला हवा, असा त्यांचा आग्रह आहे. परदेशातील शिक्षण पद्धती जाणून घेताना भारतीय शिक्षण पद्धतीचा तुलनात्मक अभ्यास करता भारतात प्रचंड लोकसंख्या हा प्रमुख अडसर असल्याचे दिसते. परदेशात १८ ते २० विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक असे प्रमाण असते, तर भारतात हेच प्रमाण ५० ते ६० विद्यार्थ्यांसाठी एक शिक्षक असे आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा विचार करता आपल्याकडे परदेशाप्रमाणे शिक्षक नियुक्त करणे कठीण आहे; परंतु अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर वाढविला तर शिक्षणाची उद्दिष्टे आपण सहज पूर्ण करू शकतो. मात्र हे करीत असतानाही शिक्षण क्षेत्र राजकारणापासून अलिप्त ठेवण्याची गरज आहे. मंत्री, पुढाऱ्यांना शिक्षण पद्धतीत बदल करण्याचे अधिकार वा त्यात हस्तक्षेप असता कामा नये. शिक्षकांना पूर्ण स्वातंत्र्य असायला हवे. केवळ पाठय़क्रम पूर्ण करण्यापुरतेच शिक्षकांचे काम नसावे, तर उद्दिष्टे पूर्ण करताना शिक्षकांना जे प्रयोग किंवा उपक्रम राबवायचे आहेत, त्यासाठी त्यांना स्वातंत्र्य आणि प्रोत्साहन मिळाले पाहिजे, असेही मत डिसले यांनी व्यक्त केले.

२००९ साली डिसले यांची जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षकपदावर निवड झाली. ते माढा तालुक्यातील परितेवाडीच्या जि. प. शाळेत नियुक्तीवर गेले असता त्यांना घडलेल्या पहिल्या दर्शनाने त्यांची शिकवण्याची उमेदच नष्ट झाली होती. कारण पडझड झालेल्या शाळेच्या वर्गखोल्यांमध्ये चक्क शेळ्या बांधलेल्या होत्या. त्यातच विद्यार्थी आणि पालकांची उदासीनता अस्वस्थ करणारी होती. त्याबद्दलचा अनुभव कथन करताना ते म्हणतात, की त्या वेळी उदास न होता नव्या दमाने प्रयत्न हाती घेतले. घरी जाऊन, वेळप्रसंगी अगदी शेतावर जाऊन विद्यार्थ्यांना गाडीवर बसवून शाळेत आणावे लागत असे. शाळेची गोडी निर्माण होण्यासाठी सुरुवातीला तब्बल सहा महिने पुस्तकांना साधा हातही न लावता आपल्या मोबाइल व लॅपटॉपच्या साह्य़ाने मुलांना गाणी, गोष्टी, कार्टून यामध्ये आकर्षित केले. ज्या शाळेची जागा जनावरांच्या गोठय़ाने घेतली होती, तेथे आठ महिन्यांनंतर वर्ग भरायला लागले. मुलांना शिक्षण देताना तंत्रज्ञानाचा केलेला वापर उपयुक्त ठरत असल्याचे लक्षात आले आणि तंत्रज्ञानाचा वापर वाढला.

‘लेट्स क्रॉस द बॉर्डर’..

’ शाळेत अध्यापन करताना जगाच्या पाठीवरील शिक्षण पद्धतीविषयी उत्सुकता होती. त्याच वेळी जगातील आठ देशांत अशांतता नांदत असल्याचे लक्षात आले. देशातील शांततेवरच त्या-त्या देशांचा विकास अवलंबून असतो, हे विचारात घेऊ न त्या आठ देशांचा शिक्षणाच्या दृष्टीने अभ्यास केला.

’ त्यातून डिसले यांना भयानक आणि तेवढेच आश्वासक असे वास्तव लक्षात आले. भारत-पाक, इराक-इराण, अमेरिका-उत्तर कोरिया, इस्रायल-पॅलेस्टाइन या आठ देशांमध्ये कायम अशांतता असून एकमेकांच्या विरोधात भावना भडकावण्याचे प्रयत्न होत असल्यामुळे त्या पार्श्वभूमीवर डिसले यांनी ‘लेट्स क्रॉस द बॉर्डर’ हा प्रकल्प हाती घेतला.

’ या सर्व देशांतील सुमारे पाच हजार विद्यार्थ्यांची ‘पीस आर्मी’ तयार केली. याकामी त्या त्या देशांतील शिक्षकही जोडले गेले. ज्या ज्या वेळी या देशांमध्ये तणाव निर्माण होई, त्या त्या वेळी हे विद्यार्थी एकमेकांशी संपर्क साधून त्या त्या देशांमधील ताणतणाव, जनजीवनाविषयीची माहिती जाणून घेत होते आणि प्रसारमाध्यमांतून येणाऱ्या खोटय़ा बातम्यांचा पर्दाफाश करीत होते. अलीकडच्या पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याविषयी भारत-पाकमधील विद्यार्थ्यांच्या भावना याच स्वरूपात होत्या.

’ डिसले यांनी आपले हे कार्य जागतिक स्तरावर नेण्यासाठी यशस्वी पावले उचलली. त्यांच्या या कामावर आता ‘ग्लोबल टीचर’ पुरस्काराने जागतिक मोहर उमटवली आहे, त्याचे डिसले गुरुजींना समाधान वाटते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Recognition and contribution of teachers should be recognized global teacher ranjit singh disley zws
First published on: 05-12-2020 at 01:06 IST