Vantara : कोल्हापूरमधील नांदणी मठातील माधुरी ऊर्फ महादेवी हत्तीण गुजरातमधून (वनतारा पशूसंवर्धन केंद्र) परत आणावी, ही जनभावना लक्षात घेऊन नांदणी मठ व राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी, असा निर्णय घेण्यात आल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं. दरम्यान महादेवी उर्फ माधुरी हत्तिणीबाबत वनताराने अधिकृत निवेदन सादर केलं आहे. आम्ही लोकांच्या भावनेचा आदर करतो असं ‘वनतारा’ने म्हटलं आहे.

माधुरीच्या देखभाल आणि शुश्रुषेबाबत वनताराचे अधिकृत निवेदन

नांदणी गावातील जैन संस्थान मठ आणि कोल्हापूरच्या लोकांमध्ये महादेवी उर्फ माधुरीचे आत्यंतिक धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे याची पूर्ण जाणीव वनताराला आहे. गेल्या अनेक दशकांपासून, ती आध्यात्मिक आणि सामाजिक जीवनाचा भाग राहिली आहे. माधुरी कोल्हापुरातच रहावी अशी इच्छा आणि आपुलकी व्यक्त करणाऱ्या भक्त, मठाचे नेते आणि लोकांच्या भावनांची पूर्ण जाणीव आणि कदर आम्ही करतो.

वनताराचा सहभाग सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांपुरताच आहे

यातील वनताराचा सहभाग सर्वोच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालय यांनी दिलेल्या बंधनकारक निर्देशांनुसार काटेकोर काम करण्यापुरता मर्यादित आहे. माधुरीला हलविण्याचा निर्णय न्यायालयाने त्याच्या अधिकारात घेतला होता. स्वतंत्रपणे चालवलेले एक बचाव आणि पुनर्वसन केंद्र म्हणून त्यात वनताराची भूमिका केवळ माधुरीची देखभाल करणे, तिला पशुवैद्यकीय सहाय्य पुरविणे आणि तिच्या निवासाची व्यवस्था करणे अशी होती. वनताराने कोणत्याही टप्प्यावर माधुरीचे स्थलांतर स्थलांतर करण्याची शिफारस केली नाही किंवा तिचे स्थलांतर सुरू केले नाही. धार्मिक प्रथा किंवा भावनांमध्ये हस्तक्षेप करण्याचा कोणताही हेतू नव्हता.

त्या कायदेशीर अर्जास ‘वनतारा’चा पूर्ण पाठिंबा

कायदेशीर वर्तन, प्राण्यांची जबाबदारीने काळजी घेणे आणि सामुदायिक सहकार्य यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. त्यानुसार माधुरीला कोल्हापूरला परत आणण्यासाठी मठ आणि महाराष्ट्र सरकार यांनी माननीय सर्वोच्च न्यायालयासमोर केलेल्या कायदेशीर अर्जास वनतारा पूर्ण पाठींबा देईल. न्यायालयाच्या मान्यतेनुसार वनतारा तिच्या सुरक्षित आणि सन्मानजनक परतीसाठी संपूर्ण तांत्रिक आणि पशुवैद्यकीय सहाय्य प्रदान करेल. त्याशिवाय मठ आणि राज्य सरकारशी समन्वय साधून कोल्हापूर नजीकच्या नांदणी परिसरात वनतारा माधुरीसाठी दूरस्थ पुनर्वसन केंद्र सुरु करण्याचा प्रस्ताव वनताराने मांडला आहे. न्यायालय आणि परमपूज्य स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी यांनी मान्य केल्यास, मठ आणि राज्य सरकारशी समन्वय साधून कोल्हापूर नजीकच्या नांदणी परिसरात वनतारा माधुरीसाठी पुनर्वसन केंद्र सुरु करेल. उच्चाधिकार समितीच्या तज्ञांशी सल्लामसलत करून ही सुविधा विकसित केली जाईल. हे केंद्र प्राणी कल्याण मार्गदर्शक तत्त्वांनुसार आणि हत्तींच्या देखभाल आणि शुश्रूषेसाठीच्या सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय पद्धतींनुसार असेल.

प्रस्तावित केंद्रामध्ये पुढील सोयी-सुविधा निर्माण करण्यात येतील

  • सांधे आणि स्नायूंवर उपचार करण्यासाठी हायड्रोथेरपी तलाव
  • पोहणे आणि नैसर्गिक हालचालीसाठी वेगळे तळे
  • शारीरिक पुनर्वसनासाठी लेसर थेरपी आणि उपचार कक्ष
  • विश्रांती आणि संरक्षणासाठी रात्री निवास
  • साखळ्या शिवाय मोकळेपणाने हालचाली करण्यासाठी हिरवीगार मोकळी जागा
  • पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी आणि माधुरीच्या नैसर्गिक विधींसाठी वाळूने भरलेला हौद
  • सतत वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी पूर्णपणे सुसज्ज ऑन-साइट पशुवैद्यकीय दवाखाना
  • माधुरीला सुरक्षित आणि आरामदायी विश्रांती घेता यावी यासाठी रबराइज्ड फ्लोअरिंग प्लॅटफॉर्म
  • पाय कुजल्याचे दुखणे बरे होण्यास, संधिवाताचा त्रास कमी होण्यास आणि सांध्यांवरील ताण कमी होण्यासाठी मदत व्हावी यासाठी आडवे होऊन झोपण्यासाठी खास काळजी घेऊन तयार केलेले मऊ वाळूचे ढिगारे.

वनताराचा प्रस्तावर कुठल्याही श्रेयासाठी नाही

मठाचे परमपूज्य भट्टारक महास्वामीजी आणि महाराष्ट्र शासन यांच्याशी चर्चा करून या सुविधेसाठी जागा निश्चित केली जाईल. न्यायालयाकडून आवश्यक सूचना मिळताच वनताराच्या तज्ज्ञांचे पथक संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वय साधून अंमलबजावणी सुरु करेल. केवळ माधुरी हत्तिणीचे पुनर्वसन करण्याच्या न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी आणि सहकार्याच्या भावनेतून, मंजुरी मिळाल्यास आंतरराष्ट्रीय मानकांनुसार हा उपक्रम हाती घेण्याचे प्रस्तावित आहे. हा प्रस्ताव केवळ आंतरराष्ट्रीय मानकांनुसार माधुरीच्या भविष्यातील काळजीबाबत न्यायालयाने जारी केलेल्या निर्देशांचे सुलभ पालन करण्यासाठी मांडण्यात आला आहे हे आम्ही स्पष्ट करू इच्छितो. वनताराच्या कोणत्याही श्रेय, मान्यता किंवा निहित हितासाठी हा प्रस्ताव नाही. ही केवळ शिफारस आहे, बंधनकारक किंवा लादलेली अट नाही. न्यायालयाच्या अंतिम निर्देशांनुसार जैन मठ मांडू इच्छित असलेल्या कोणत्याही पर्यायी प्रस्तावाबद्दल आम्ही पूर्णपणे खुले आहोत आणि अशा प्रस्तावास आम्ही मान देतो. त्यापुढे जाऊन, नांदणी मठास हवे असलेले सर्व सहाय्य करण्याची वनताराची इच्छा आणि तयारी आहे.

आमचा सहभाग केवळ न्यायालयीन निर्देशानुसार असला तरी, जैन समुदायाला किंवा कोल्हापूरच्या लोकांना त्यामुळे काही त्रास होत असेल तर आम्ही मनःपूर्वक खेद व्यक्त करतो. मिच्छामी दुक्कडम जाणूनबुजून किंवा अजाणतेपणे आमचे विचार, शब्द किंवा कृतीने तुम्हाला दुखावले असेल, तर त्यासाठी आम्ही तुमची क्षमा मागतो.

आपण सर्वजण माधुरीवरील प्रेमापोटी एकदिलाने काम करू.

आदरपूर्वक सादर,

टीम वनतारा

असं सविस्तर निवेदन देत वनताराने महादेवी हत्तिणीबाबत त्यांची भूमिका काय आहे ते स्पष्ट केलं आहे.