सांगली : इस्लामपूरचे नामकरण ईश्वरपूर करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतल्याचे विधिमंडळात जाहीर होताच शहरात कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करीत आनंदोत्सव साजरा केला.

इस्लामपूर शहराचे ईश्वरपूर असे नामकरण करण्याची मागणी शासनाकडे बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असल्याचे सांगत, विधान परिषदेत आमदार सदाभाऊ खोत यांनी हे नामकरण करण्यात यावे, अशी आग्रही मागणी केली. याबाबत उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी इस्लामपूर शहराचे नामकरण ईश्वरपूर करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला असल्याचे सांगितले. या निर्णयाचे आमदार खोत यांनी स्वागत करून वाळवा तालुक्यातील जनतेची दीर्घ काळची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केल्याबद्दल अभिनंदन केले.

दरम्यान, मंत्री छगन भुजबळ यांनी पावसाळी अधिवेशनाच्या अंतिम दिवशी इस्लामपूरचे नामकरण ईश्वरपूर करण्यात येत असल्याची घोषणा विधानसभेत केली. हा प्रस्ताव आता राज्य शासनाकडून केंद्र शासनाकडे पाठविण्यात येणार असून केंद्र शासनाच्या मान्यतेने शहराचे नामांतर करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

या निर्णयाचे इस्लामपूर शहरात शिवसेना (शिंदे) गटाने फटाके फोडून स्वागत केले. तसेच शहरात पदयात्रा काढून जल्लोष केला. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांनीही या निर्णयाचे स्वागत केले. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ एकत्र येऊन महायुती सरकारच्या निर्णयाचे स्वागत करून फटाकेही फोडले.

भोसले-पाटील म्हणाले, ‘मी नगराध्यक्ष असताना शहराचे नामकरण ईश्वरपूर करण्यासाठी आंदोलन करण्यात आले होते. आमदार खोत यांनी विधान परिषदेत हा प्रश्न उपस्थित करून जनतेच्या मागणीला शासन स्तरावर न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे. याबद्दल जनतेच्या वतीने महायुती सरकारचे, मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार एकनाथ शिंदे यांचे आभार मानतो.’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इस्लामपूर शहराचे ईश्वरपूर असे नामकरण करावे, अशी मागणी ४० वर्षांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून करण्यात आली होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची डिसेंबर १९८६ मध्ये इस्लामपुरातील यल्लमा चौकात जाहीर सभा झाली होती. त्या वेळी त्यांनी, ‘इस्लामपूर नव्हे, तर ईश्वरपूर,’ असा प्रथमच जाहीर उल्लेख केला होता.