सांगली : इस्लामपूरचे नामांतर ईश्वरपूर राज्य शासनाने केले असले तरी नामविस्तार करताना यामध्ये उरण ईश्वरपूर असेच करावे, अशी मागणी बुधवारी इस्लामपूरमध्ये उरणवासीयांच्या वतीने करण्यात आली. या मागणीसाठी बुधवारी तहसीलदार कार्यालय व नगरपालिकेवर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले.

शहराचे नाव उरण इस्लामपूर आहे. राज्य शासनाने शहराचे नामांतर ईश्वरपूर करण्याचा निर्णय विधीमंडळात जाहीर केला. या निर्णयाचे सर्व पक्षाकडून स्वागतच करण्यात आले. मात्र, नामविस्तार करत असताना केवळ ईश्वरपूर असे नामकरण न करता यामध्ये उरण असा उल्लेख आवश्यक असल्याचे मत विविध पक्षाच्या नेत्यांनी निवेदनात केला.

शहरातील केंद्र, राज्य शासनाची कार्यालये, पोस्ट, बँका या सर्व कार्यालयांचे नाव बदलत असताना उरण ईश्वरपूर असे करावे, अशी मागणी करण्यात आली. इस्लामपूरची स्थापना १८७५ मध्ये झाली असली तरी त्या पूर्वीपासून उरण गाव अस्तित्वात आहे. यामुळे शहराच्या नावाची परंपरा व ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता उरण नाव समाविष्ट करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या मोर्चामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष निशीकांत भोसले-पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे शहराध्यक्ष शहाजीबापू पाटील, माजी नगरसेवक खंडेराव जाधव, पोलीस पाटील बाळासाहेब पाटील, विश्वासराव पाटील, विलासराव ताटे यांच्यासह उरणमधील प्रमुख कार्यकर्ते सहभागी झाले होते.