सावंतवाडी : वेंगुर्ला तालुक्यातील चिपी-कालवंडवाडी येथील खाडीपात्रामध्ये बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्यांवर वेंगुर्ला महसूल विभागाने मोठी कारवाई केली आहे. तारकर्ली पुलाजवळ २१ सप्टेंबरच्या मध्यरात्री तहसिलदार ओंकार ओतारी यांच्या उपस्थितीत महसूल विभाग आणि पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केलेल्या या कारवाईत दोन होड्या (बोटी) जप्त करण्यात आल्या असून, त्यातून सुमारे ५ ब्रास वाळू हस्तगत करण्यात आली आहे.
या प्रकरणी वाळू उपसा करणाऱ्या उत्तर प्रदेशमधील सात कामगारांना ताब्यात घेण्यात आले आहे. यामध्ये वीर बहादूर संकर, विवेक बाबा, संतु बाबा, हिंदू यादव, जितेंद्र सहा, ज्युव यादव आणि राजन बहर (सर्व रा. बहरिया, जि. बलिया, उत्तर प्रदेश) यांचा समावेश आहे. पुढील कारवाईसाठी या सर्व कामगारांना निवती पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
तहसीलदार ओंकार ओतारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भीमसेन गायकवाड, ग्राम महसूल अधिकारी रजनीकांत नायकोडे, गौतम सुतार, नामदेव मोरे, पोलीस हवालदार कदम, पोलीस ड्रायव्हर लोणे आणि पोलीस पाटील संदेश पवार यांनी ही कारवाई केली.