रामराजे नाईक-निंबाळकर आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्यातील वाद काही नवीन नाही. हे दोघेंही एकमेकांविरोधात बोलण्याची एकही संधी दवडत नाहीत. खासदार उदयनराजेंकडून आपल्या जीविताला धोका असल्याचे वक्तव्य विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी पुन्हा एकदा केले आहे. काही दिवसांपूर्वी उदयनराजेनी फलटणमध्ये येऊन मी येथे आलोय, तुमच्या घरी यायला सुद्धा वेळ लागणार नाही. यांच्यामुळे नको त्यांचं फावतंय अशा शब्दांत रामराजेंना इशारा दिला होता.

त्यानंतर सातारा येथे शासकीय विश्रामगृहावर रामराजे नाईक निंबाळकर आलेले असताना उदयनराजेही तिथे पोहोचले आणि कुठे आहे भगीरथ बघायचंय त्याला, असे म्हणत त्यांच्या कक्षाकडे जात होते. पण त्याचवेळी तत्कालीन पोलीस अधीक्षक संदीप पाटील तिथे पोहोचल्याचे समजल्यावर उदयनराजे तिथून निघून गेले होते. या नंतर मागील आठवड्यात रामराजे सातारा येथे आले असता त्यांनी सावज टप्प्यात येण्याची वाट बघतोय, ते टप्प्यात आलं तर मग बघा मी पण सोडत नाही, असे सांगून पुन्हा चर्चेला हवा दिली होती. आज पुन्हा रामराजेंनी मला त्यांच्या पासून जीविताला धोका असल्याचे वक्तव्य केले.

फलटण येथे झालेल्या कार्यक्रमात त्यांनी उदयनराजेंकडून आपल्या जीविताला धोका असल्याचे मत व्यक्त केले. तसेच जिल्ह्याचा विकास म्हणावा तितका झालेला नाही. जिल्ह्यातील लोक आमच्याकडे चर्चा करायला येतात. पण जिल्ह्याच्या विकासाऐवजी वैयक्तिक व सामाजिक समस्यांबरोबरच ‘मोक्का पर्यंतच्या सर्व चर्चा ते करतात. राजकारणात काय होईल ते सांगता येत नाही. तथापि आमच्या जीवालाही धोका असल्याचे त्यांनी सांगितले. मला दिल्लीला जावेच लागेल, आता मला खाली नाही तर वर जायचे आहे, असा इशारा देत लोकसभेची निवडणूक लढवायची इच्छा व्यक्त केली. यावेळी फलटणचे आमदार दीपक चव्हाण आदी उपस्थित होते .

उदयनराजे व रामराजे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे वजनदार नेते आहेत. मात्र या दोघांनी गेली अनेक दिवस एकमेकावर टीका करण्याची संधी सोडलेली नाही. काही दिवसांपूर्वी उदयनराजे यांनी फलटणमध्ये येऊन तुमच्या घरी यायला सुद्धा वेळ लागणार नाही, असा जणू रामराजेंना दमच दिला होता. यावर रामराजे नाईक निंबाळकर यांनी सातारा येथे जाऊन मी कोणत्याही गोष्टी विसरलो नाही. वेळ आल्यावर शिकार करणारच, असे ठणकावून सांगितले.