सातारा : कोयना धरणासह धोम, धोम-बलकवडी, कण्हेर, उरमोडी, तारळी व वीर या प्रमुख धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत असल्याने नद्यांना पूर आला आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचे आदेश दिले असून जिल्ह्यातील १२९ कुटुंबांतील ३६१ नागरिकांचे तात्पुरते स्थलांतर केल्याची माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिली.
सातारा जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. बहुतांश धरणे भरली असून त्यातून नद्यांमध्ये विसर्ग सुरू करण्यात आला आहे. साताऱ्यातील कोयनेसह वीर, धोम व धोम बलकवडी, उरमोडी, कण्हेर, भाटघर धरणे पूर्ण क्षमतेने भरल्याने या धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्यात येत आहे. यामुळे जिल्ह्यातून वाहणाऱ्या कृष्णेसह कोयना, वेण्णा, नीरा, उरमोडी नद्यांना पूर आले आहेत. यामुळे नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. या पावसामुळे नदीकाठच्या शेकडो हेक्टरमधील शेतात पाणी शिरले आहे. दुर्गम भागातील अनेक रस्ते, पूल पाण्याखाली गेले आहेत. आपत्ती असलेल्या भागातील शाळांना दोन दिवस सुटी जाहीर करण्यात आली आहे. तसेच नदीकाठच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरण्याचा धोका ओळखून तेथील नागरिकांचे स्थलांतर सुरू केले आहे.
या आपत्तीसंदर्भात बुधवारी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी नागरिकांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी जिल्ह्यातील पूरस्थिती नियंत्रणात असून आपत्ती व्यवस्थापन विभाग कार्यरत असल्याचे सांगितले. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील १२९ कुटुंबातील ३६१ नागरिकांचे तात्पुरते स्थलांतर केल्याची माहितीही जिल्हाधिकारी पाटील यांनी दिली.
यामध्ये पाटण तालुक्यात पाटण शहरात १३ कुटुंबांतील ४५ नागरिकांना, हेळवाक येथील ५ कुटुंबांतील १७ नागरिकांना, वडी, औंध वस्ती येथील ७ कुटुंबांतील १५ नागरिकांना, कराड तालुक्यातील कराड शहर, पत्राचाळ, पाटण कॉलनी, कोयना दूध कॉलनी, रुक्मिणीनगर येथील ६ कुटुंबांतील २४ नागरिकांना, महाबळेश्वर तालुक्यातील येर्णे बु. येथील ८ कुटुंबातील १८ नागरिकांना, वाई शहरातील ४० कुटुंबांतील १३५ नागरिकांना, सातारा तालुक्यातील भैरवगड येथील ३० कुटुंबांतील ६५ नागरिकांना, मोरेवाडी येथील २० कुटुंबांतील ४२ नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.
दरम्यान पाटण तालुक्यातील हेळवाक, कोयनानगर या ठिकाणी पाणी आलेल्या भागात प्रांताधिकारी सोपान टोणपे आणि तहसीलदार अनंत गुरव यांनी भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. दरम्यान धोम धरणातून होत असलेल्या विसर्गामुळे कृष्णा नदीकाठील वाईतील मंदिरे पाण्यात गेली आहेत. मौजे जिहे येथील जिहे कठापूर रस्त्यावरील पुलावरून पाणी जात असल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे.
पाटण तालुक्यात नेरळे पूल व मुळगाव पूल पाबळनपाला रस्ता खचल्याने, कराड- हेळवाक रस्ता, महाबळेश्वर तालुक्यातील देवसरे-मजरेवाडी आदी मार्ग रस्त्यांवर पाणी आल्याने बंद करण्यात आले आहेत. वेण्णा नदीवरील हमदाबाज-किडगाव पूल, करंज-म्हसवे पूल, मौजे जिहे येथील जिहे-कठापूर रोडवरील पुलावरून पाणी वाहत असल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. खंडाळा तालुक्यातील नीरा नदीवरील लोणंद (वाठार)-वीर रस्ता व नीरा नदीवरील पाडेगाव येथील रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. उरमोडी धरणामधील विसर्गामुळे परळी बाजारपेठ ते आंबवडे पूल पाण्याखाली गेला असून बॅरिगेट्स लावून वाहतूक पूर्ण बंद केली आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भिलार (ता. महाबळेश्वर) येथील केंद्रप्रमुखांच्या कार्यालयाची भिंत रात्री पडली आहे.