वाई : सातारा पंढरपूर रस्त्यावर सातारा शहरालगत असणाऱ्या संगम माहूली येथे निकृष्ट रस्त्याच्या कामाच्या निषेधार्थ आज (मंगळवार) दुपारी ग्रामस्थांनी एकत्र येत सातारा पंढरपूर लातूर राज्य महामार्गावर रास्ता रोको आंदाेलन केले आहे. यामुळे वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत.
सातारा शहरापासून संगम माहुलीपर्यंत बनवलेला रस्ता निकृष्ट दर्जाचा आहे. या ठिकाणी बावीसहून अधिक लोकांचा मागील काही वर्षांत मृत्यू झाला आहे. याबाबत वारंवार प्रशासनास निवेदन देऊनदेखील प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा ग्रामस्थांचा आराेप आहे.
हेही वाचा – “…तेव्हा कारवाई करू नका”, अमित शाहांचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगाला इशारा
हा रस्ता लवकरात लवकर व्हावा, त्याच्या दुरावस्थेकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज संगम माहुली येथे पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी एकत्र येत रास्ता रोको आंदाेलन केले. तसेच अपघातांच्या घटनेला संबंधित ठेकेदार आणि कंपनी जबाबदार आहे. त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. सातारा पंढरपूर लातूर राज्य महामार्गावर रास्ता रोको आंदाेलन केल्याने वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत. पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.