भावनगर-काकीनाडा सुपर एक्सप्रेसवर सशस्त्र दरोडा पडला असून यात दरोडेखोरांनी महिला प्रवाशांना लक्ष्य बनवून सोन्याचे दागिने आणि रोकड लुटली. कुर्डूवाडी ते सोलापूरदरम्यान मोहोळनजीक मलठण भागात रात्री आठच्या सुमारास हा प्रकार घडला.
भावनगरहून काकीनाड्याकडे (क्र. १७२२२) जाणारी सुपर एक्सप्रेस दौंडहून थेट सोलापुरातच थांबते. त्यामुळे बहुतांशी प्रवासी गाडीत झोपले होते. कुर्डूवाडीच्या पुढे मोहोळजवळ मलिकपेठ स्थानकानजीक गाडीला वेग अचानकपणे खूपच मंदावला. तेव्हा सशस्त्र दरोडेखोरांनी गाडीत प्रवेश केला. एस-१, एस-६ आणि एस-७ या तीन कोचमध्ये घुसून दरोडेखोरांनी धुमाकूळ घालताच गोंधळ उडाला. दरोडेखोरांनी शस्त्रांचा धाक दाखवत प्रवाशांमध्ये दहशत निर्माण केली. विशेषतः महिला प्रवासीनाच दरोडेखोरांनी लक्ष्य बनविले होते. गौसीयाबेगम (वय ६०) यांच्याकडून दोन तोळे सोने आणि सात हजार रूपये रोकड, श्रीमती राधा (वय ४२) यांच्याकडून अडीच तोळे सोने आणि श्रीमती गीता यांच्याकडून चार तोळे सोने आणि साडेसात हजारांची रोकड असा ऐवज दरोडेखोरांनी लुटला. नंतर क्षणार्धात गाडीतून उड्या मारून दरोडेखोर पसार झाले.
दरम्यान, प्रवाशांनी रेल्वेतील तिकीट तपासनीस खुशीराम मीना यांच्याकडे तक्रार नोंदविली. पुढे गाडी सोलापूर स्थानकावर येताच पीडित प्रवाशांची फिर्याद रेल्वे सुरक्षा बल विभागात दाखल करण्यात आली.
लुटमार होण्यापूर्वी भरधाव असलेल्या गाडीचा वेग अचानकपणे झटक्यात कसा मंदावला, याबद्दल शंका-कुशंका व्यक्त होत असताना दरोडेखोरांनी ट्रेक कमी करून गाडीचा वेग कमी करण्यास भाग पाडल्याची माहिती समोर आली आहे.