Rohini Khadse on EVM: विधानसभा निवडणुकीच्या निकालात ईव्हीएमने घोळ केल्याचा आरोप करत राज्यातील काही पराभूत उमेदवारांनी फेर मतमोजणीची मागणी केली. यामध्ये सर्वपक्षीय उमेदवारांचा समावेश आहे. ईव्हीएममध्ये गडबड असल्याचा आरोप होत असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा आणि मुक्ताईनगरच्या उमेदवार रोहिणी खडसे यांनी धक्कादायक आरोप केला आहे. मुक्ताईनगरमधील १६ मतदान केंद्रावरील व्हीव्हीपॅटच्या पावत्यांची मोजणी करावी, यासाठी रोहिणी खडसे यांनी अर्ज दाखल केला आहे. यासाठी त्यांनी अनामत रक्कमही भरली आहे. मुक्ताईनगरमध्ये अनेक मतदान केंद्रावर संशयास्पद निकाल लागला असल्याचा आरोपही रोहिणी खडसे यांनी केला.

माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या, मुक्ताईनगरमध्ये निकाल लागण्याआधीच एक यादी सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आली होती. या यादीत प्रतिस्पर्धी उमेदवाराने अमुकतमुक मते मिळतील, अशी गँरटी व्यक्त केली होती. त्या यादीतील आकडे आणि निकाल लागल्यानंतर विशिष्ट मतदान केंद्रावरील मतदान तंतोतंत कसे जुळले? असा प्रश्न निर्माण होत आहे. पाच-दहा मते इकडे-तिकडे केल्यास त्या यादीतील अंदाजाप्रमाणे अचूक निकाल लागला असल्यामुळे संशय घेण्यास जागा आहे. असा कोणताही ज्योतिषी जन्माला आलेला नाही, जो दोन दिवसांनी लागणाऱ्या निकालाचे आकडे इतक्या अचूक पद्धतीने आधीच सांगू शकेल. हे सर्व संशयास्पद आहे.

हे वाचा >> Sharad Pawar: “EVM सेट होऊ शकतं, याचं प्रेझेंटेशन आम्हाला मिळालं होतं, पण…”, ईव्हीएमबाबत शरद पवारांचं मोठं विधान

हा लोकांचा कल नसून ईव्हीएमने दिलेला कल

रोहिणी खडसे पुढे म्हणाल्या, मुक्ताईनगर विधानसभेत अशी काही गावे आहेत, जिथे प्रतिस्पर्धी उमेदवाराला मते मिळण्याची कोणतीही शक्यता नव्हती. तिथेही त्यांना जास्त मते मिळाली आहेत. मागच्या तीस वर्षांपासून काही गावात माझे वडील आणि मी कधीही कमी मतदान घेतलेले नाही. अशा गावातही आम्हाला कमी मतदान झाले आहे. हे शक्य नाही. कुठली लाट आहे किंवा एखादी योजना लोकप्रिय झाली म्हणून जवळचे मतदार पटकन नाते तोडत नाही. हा लोकांचा कल नसून ईव्हीएमने दिलेला कल आहे.

अमेरिकेनेही ईव्हीएम नाकारले

अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रानेही निवडणुकीत ईव्हीएमचा वापर टाळला आहे. तिथे मतपत्रिकेवर मतदान होत आहे. त्यामुळे आपल्याकडेच ईव्हीएम का वापरले जात आहे? जर सत्ताधाऱ्यांनी काहीही चुकीचे केलेले नसेल आणि त्यांना जनतेवर विश्वास असेल तर एकदा मतपत्रिकेवर निवडणुका होऊन जायला हव्यात. म्हणजे लोकांचा कुणावर विश्वास आहे, हे एकदाचे कळेल.

हे ही वाचा >> Voter Turnout Increase: ‘शेवटच्या तासात लाखोंच्या संख्येने मतदान कसं वाढलं?’, मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितलं खरं कारण

रोहिणी खडसे यांनी मुक्ताईनगर विधानसभेतून दुसऱ्यांदा निवडणूक लढविली आहे. २०१९ साली एकनाथ खडसे यांनी हा मतदारसंघ मुलगी रोहिणी खडसेसाठी सोडला होता. मात्र त्यावेळी अपक्ष उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी त्यांचा पराभव केला होता. यावेळी चंद्रकांत पाटील हे शिवसेना (शिंदे) पक्षाकडून निवडणुकीला उभे होते. यावेळीही त्यांचा विजय झाला. चंद्रकांत पाटील यांना १,१२,३१८ एवढी मते मिळाली तर रोहिणी खडसे यांना ८८,४१४ एवढी मते मिळाली. तब्बल २३,९०४ मतांनी त्यांचा पराभव झाला.

Rohini Khadse muktainagar result
रोहिणी खडसे यांना किती मते मिळाली?

फेर मतमोजणीसाठी किती खर्च येतो?

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीनुसार, फेर मतमोजणी करायची असल्यास प्रति मतदान केंद्र ४७,२०० एवढा खर्च येतो. मतमोजणी झाल्यानंतर सर्व ईव्हीएम मशीन सुरक्षित ठेवले जातात. त्याला त्रिस्तरीय सुरक्षा प्रदान केली जाते. जर ईव्हीएम बाहेर काढायचे असेल तर उच्च न्यायालयाची परवानगी आणावी लागते.