Rohit Pawar Karjat Jamkhed Aamsabha: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार हे सध्या त्यांच्या मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. नुकतीच त्यांनी कर्जतमधील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी विभागीय अधिकाऱ्यांची आमसभा घेतली होती. त्यापाठोपाठ आज (शनिवार, २० सप्टेंबर) जामखेडमध्ये देखील विभागीय अधिकाऱ्यांची संयुक्त आमसभा घेतली. मात्र, या सभेवेळी नागरिकांनी काही समस्या उपस्थित केल्यानंतर एका अधिकाऱ्याने मोघम उत्तरं देण्यास सुरुवात केली. तसेच त्या अधिकाऱ्याची देहबोली गंभीर दिसत नसल्याने रोहित पवार यांनी संताप व्यक्त केला. या घटनेचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे.
जामखेडमधील एका नागरिकाने तो ज्या परिसरात राहतो तिथल्या गटारांची समस्या मांडली. त्याने सांगितलं की “आमच्या घरामागे बाजार आहे. तिथून पावसाचं पाणी थेट आमच्या घरांमध्ये शिरतंय. कारण तिथे गटाराची कामं झालेली नाहीत.” यावर रोहित पवार म्हणाले, “आपण त्यासाठी ८० कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे.” त्यानंतर अधिकाऱ्यांनी स्थानिगांना सांगितलं की “तुमच्या परिसरात गटाराचं काम चालू आहे.” यावर स्थानिक म्हणाले, “काम चालू असून अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे. त्या कामावर कुठल्याही अधिकाऱ्याचं लक्ष नाही. कंत्राटदार त्याच्या मनाने वाट्टेल तसं काम करतोय.” यासह नागरिकांनी गटारांच्या कामाचे त्यांच्याकडील फोटो व व्हिडीओ दाखवले.
नेमकं काय घडलं?
यावर संबंधित अधिकारी उत्तर देण्यासाठी उभे राहिले. त्यावर स्थानिकांनी विचारलं की “सदर कामांवर तुमचा अधिकारी आहे का?” यावर अधिकारी म्हणाले, “आम्ही विविध कामांवर सुपरव्हायजर, कन्सल्टंट नेमले आहेत. सदर कामावर दोन माणसं नेमली आहेत. तुम्ही म्हणताय तशी स्थिती नाही. दोन जण लक्ष ठेवून आहेत.” त्यानंतर स्थानिकांनी पुन्हा एकदा पुरावे म्हणून फोटो व व्हिडीओ दाखवले आणि म्हणाले, “हे काही दुसऱ्या कामाचे फोटो नाहीत. तुमच्याच ड्रेनेज लाइनचा फोटो आहे. इथे तुमचा सुपरव्हायजर आहे का?” यावर अधिकारी म्हणाले, “आम्ही खराब काम करत नाही. आपण हवं तर उद्या तिथे जाऊन चेंबर पाहू.”
अधिकाऱ्याचं हे उत्तर ऐकून रोहित पवार संतापून म्हणाले, “एवढे दिवस तू काय गोट्या खेळत होतास? याकडे गांभीर्याने बघ आणि काम कर.”
रोहित पवारांना राग अनावर
“ए… आतापर्यंत तू गोट्या खेळत होतास का? हे बावळट लोक आहेत का? ही वेडी माणसं आहेत का? खिशातला हात आधी काढ. लय शहाणा बनू नको. खूप मोठं काम करतोयस ते आम्हाला माहिती आहे. मिजासखोर बनू नकोस. या लोकांनी दाखवलेलं काम खराब आहे. हा तुमच्या बापाचा पैसा नाही. तू कुठलाही असशील, परंतु या लोकांना इथेच राहायचं आहे. ही खराब कामं आहेत आणि तू उद्या बघतो, करतो अशी उत्तर देतोयस. तुझे व तुझ्या अधिकाऱ्याचे पराक्रम आम्हाला माहिती आहेत. तू त्या कामावर कन्सल्टंट लाव आणि चांगल्या दर्जाचं काम कर. जास्त अहंकार दाखवू नको. उद्या ही माणसं पिसाळली तर तुला फिरता येणार नाही.”
आमदार रोहित पवार यांनी यावेळी लोकांना आवाहन केलं की “हे असे अधिकारी असतील तर त्यांच्यावर शेण फेका.”