Rohit Pawar on Balraje Patil Challenges Ajit Pawar : सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील अनगर नगर पंचायतीच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध झाली आहे. भाजपाकडून माजी आमदार राजन पाटील यांच्या सूनबाई प्राजक्ता अजिंक्यराणा पाटील या निवडून येणार हे जवळपास स्पष्ट झाल्यानंतर पाटील कुटुंब, त्यांचे समर्थक व भाजपा कार्यकर्त्यांनी नगर पंचायत कार्यालयाबाहेर जल्लोष केला. यावेळी कार्यकर्त्यांबरोबर नाचत असताना राजन पाटील यांचे पुत्र विक्रांत ऊर्फ बाळराजे पाटील यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आव्हान दिलं.

बाळराजे पाटलांचा अजित पवारांना त्वेषाने आव्हान देतानाचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. या व्हिडीओची सोलापूरच्या राजकारणात बरीच चर्चा होत आहे. या व्हिडीओत दिसतंय की बाळराजे पाटील कॅमेऱ्याकडे बोट दाखवून अगदी त्वेषाने म्हणाले, “अजित पवार… सगळ्यांचा नाद करा, पण अनगरकरांचा नाय.”

रोहित पवारांचा बाळराजे पाटलांवर संताप

यावरुन आता बाळराजे पाटलांवर टीका होऊ लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार तथा अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट लिहून बाळराजे पाटलांच्या कृत्यावर संताप व्यक्त केला.

“त्तेच्या जीवावर अंगात मस्ती येते”

रोहित पवार म्हणाले, “राजन पाटीलजी, आपण ज्येष्ठ नेते आहात, आपला नेहमीच आदर आहे. परंतु, काल आपल्या चिरंजीवांचा अजित पवारांवर एकेरी भाषेत टीका करणारा व्हिडिओ बघून मात्र अत्यंत वाईट वाटले. आपण स्वतः एकत्रित राष्ट्रवादीत सत्तेत असताना सुद्धा कधी अशी भाषा विरोधकांविरोधात वापरली नाही. ज्या सत्तेच्या जीवावर अंगात मस्ती येते पण ती सत्ता येत जात असते. हे आपल्या चिरंजीवांना कदाचित माहीत नसेल. मतचोरीच्या जीवावर भाजपाचे उभे राहिलेले सत्तेचे इमले कधी कोसळतील सांगता येत नाही, त्यामुळे त्यांना म्हणावं थोडं दमाने घ्या. असो, भाजपाच्या नादी लागल्यावर राजकीय संस्कृती आणि महाराष्ट्र धर्माचा विसर पडतोच! आपण त्यांना योग्य ती समज द्याल ही अपेक्षा.”

अमोल मिटकरींचा संताप

बाळराजे पाटलांच्या कृत्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार) विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी यांनी देखील संताप व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की “राजन पाटील आणि त्यांची दोन्ही वाया गेलेली मोकाट कार्टी यांना सत्तेचा अति माज आलाय. ज्यांच्या तुकड्यावर जगलात त्यांच्याबद्दल केलेली मस्तीची भाषा याला प्रसंगी योग्य उत्तर देऊच पण तूर्तास या औलादींची मस्ती ‘मालकाला’ भिकारी बनवेल… तुर्तास इतकेच.”