Rohit Pawar Demands Funds for Karjat Jamkhed : “अजित पवारांनी जरा भावकीकडे लक्ष द्यावं”, अशी विनंती आमदार रोहित पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्र्यांकडे केली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात माझ्या मतदारसंघात चांगला निधी येत होता. मात्र आता अजित पवार यांनी ‘अपनो को किया पराया’ अशी स्थिती असल्याचं वक्तव्य करत रोहित पवारा यांनी अजित पवार यांना टोला लगावला आहे. विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा (७ जुलै) सहावा दिवस आहे. आज दुपारी विधानसभेत पुरवणी मागण्यांवर चर्चा पार पडली. यावेळी आमदार रोहित पवार यांनी सभागृहात त्यांची व्यथा मांडली.

आमदार रोहित पवार म्हणाले, “महाविकास आघाडी सरकारच्या काळात आमच्या कर्जत-जामखेड मतदारसंघाला मोठ्या प्रमाणात निधी मिळत होता. कदाचित त्यावेळी काही लोक आमच्या बरोबर होते, आमच्या जवळ होते. त्यामुळे अजित पवार आमच्या मतदारसंघाला मोठ्या प्रमाणात निधी देत होते. मात्र, दुर्दैवाने नंतरच्या काळात ‘अपने हुए पराये’ किंवा ‘अपनों को किया पराया’ अशी स्थिती झाली आहे. माझ्या मतदारसंघात निधी येणं खूप कमी झालं आहे.”

“अजित पवारांनी गावकीकडे बघत असताना जरा भावकीकडे देखील बघावं”

निधीअभावी विकासकामं रखडल्याचं सांगत रोहित पवार म्हणाले, “मला उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सांगायचं आहे की शेवटी ‘अपने तो अपने होते हैं’. त्यामुळे मी अजित पवार यांना विनंती करतो की तुम्ही सगळ्या गावकीकडे बघत आहात. मात्र, गावकीकडे बघत असताना जरा भावकीकडे देखील बघावं. माझ्या मतदारसंघात निधी कमी पडतोय. मतदारसंघातील विकासकामांसाठी, माझ्या लोकांच्या भवितव्यासाठी आम्हाला निधी देण्यात यावा, अशी माझी विनंती आहे. अजित पवार यांनी राजकारण बाजूला ठेवून आमच्या मतदारसंघाचा विचार करावा अशी त्यांच्याकडे विनंती आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मागण्या मंजूर, मात्र निधीअभावी कामास विलंब, रोहित पवारांची खंत

आमदार रोहित पवार म्हणाले, “मतदारसंघातील विकासकामांचं भूमिपूजन ज्याला कोणाला करायचं असेल त्याला करू द्या. परंतु, लोकांच्या अनेक मागण्या आहेत. आमच्या मतदारसंघातील लोकांशी संबंधित मागण्या पूर्ण व्हाव्यात. प्रामुख्याने गृह विभागाशी संबंधित मागण्या आम्ही मांडल्या होत्या. त्यापैकी बहुसंख्य मागण्या मंजूर झाल्या आहेत. मात्र, निधीअभावी काम सुरू झालेलं नाही. त्यामुळे आम्हाला निधी देण्यात यावा अशी विनंती मी करतो.