सध्या देशात ‘इंडिया’ आणि ‘भारत’ नावावरून मोठा गदारोळ सुरू आहे. मोदी सरकारनं पाच दिवस संसदेच विशेष अधिवेशन बोलावलं आहे. या अधिवेशनात संविधानातील ‘इंडिया’ नाव हटवणार असल्याची चर्चा सुरू आहे. यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे.

“नाव बदलून प्रश्न सुटत असतील, तर हुकूमशाहीला लोकशाही म्हणायला हवं,” अशी टीका रोहित पवार यांनी ‘एक्स’ ( ट्वीटर ) अकाउंटवरून मोदी सरकारवर केली आहे.

रोहित पवार म्हणाले, “नाव बदलून प्रश्न सुटत असतील, तर गरिबीला श्रीमंती, बेरोजगार युवकाला नोकरीवाला, महागाईला स्वस्त, भ्रष्टाचाराला सुशासन, खराब रस्त्यांना चकाचक रस्ते, आत्महत्येला इच्छामरण, हुकूमशाहीला लोकशाही म्हणायला हवं.”

हेही वाचा : मराठवाडय़ातील मराठेही कुणबी; निजामकालीन नोंदी असलेल्यांना दाखले देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

“देशाच्या मुलभूत समस्या सोडवण्यात आलेले अपयश लपवण्यासाठी भावनिक राजकारण करायचे. देशाचे मूळ मुद्दे चर्चेतून बाजूला सारायचे हाच एकमेव अजेंडा हे सरकार चालवत आहे. त्यामुळे महागाई ,बेरोजगारी, शिक्षण, दुष्काळ या विषयांना प्राधान्य द्यावे की नाव बदलण्याच्या चर्चेला प्राधान्य द्यावं, हे आता जनतेनेच ठरवायला हवं,” असं रोहित पवारांनी म्हटलं.

“मीडिया व सर्वच विरोधी पक्षातील नेत्यांनी मूळ मुद्द्यांना बाजूला सारण्याचा सरकारच्या या जाळ्यात न अडकता मूळ मुद्द्यांवरच चर्चा करायला हवी,” अशी विनंती रोहित पवारांनी केली आहे.

हेही वाचा : “सनातन धर्माला डेंग्यू, मलेरिया, करोनाप्रमाणे संपवले पाहिजे हे विधान…”; उदयनिधी स्टॅलिनच्या वक्तव्यावर ठाकरे गटाचं प्रत्युत्तर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“कोणीही नाव हटवू शकत नाही”

संविधानातून नाव हटवण्याच्या चर्चेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “हे नाव हटवण्याचा अधिकार कोणालाही नाही. कोणीही नाव हटवू शकत नाही. सत्ताधारी लोकांना देशाशी निगडीत असलेल्या नावाची एवढी अस्वस्थता का वाटत आहे, हे मला समजत नाही,” असा टोला शरद पवार यांनी मोदी सरकारला लगावला आहे.