Rohit Pawar on Devendra Fadnavis Mumbai Speech : “कोणीही एकत्र आले, तरी आमचा विजय थांबवू शकत नाही आणि आगामी मुंबई महानपालिका निवडणुकीत मुंबईत महायुतीचाच महापौर होणार”, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पार्टीच्या ‘महाविजय संकल्प’ मेळाव्यात मंगळवारी (१७ सप्टेंबर) व्यक्त केला. “शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हा एक ‘ब्रँड’ होता, पण नुसतं ठाकरे हे नाव लावल्याने तुम्ही ‘ब्रँड’ बनत नाही”, अशा शब्दांत फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर टीका केली.

दरम्यान, फडणवीस यांनी यावेळी केलेल्या एका वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवार म्हणाले, “फडणवीसांच्या भाषणातील एक वक्तव्य हे त्यांच्या मित्रपक्षांसाठी इशारा देणारं होतं. कारण फडणवीस त्यांच्या भाषणात म्हणाले की कोणी सोबत आलं नाही तरी मुंबई महापालिकेवर आमचा भगवा झेंडा फडकेल.”

रोहित पवार काय म्हणाले?

रोहित पवार यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की “पत्रकारांनी माझं म्हणणं लिहून घ्यावं, शूट करुन घ्यावं आणि त्याच्या क्लिपही साठवून ठेवाव्यात, काहीही झालं तरी मुंबईत महायुतीचाच महापौर बसणार, हा मुख्यमंत्री देवाभाऊंनी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील विजयाचा दाखवलेला नेक्स्ट लेव्हलचा कॉन्फिडन्स मतदार यादी, ईव्हीएम मशीन आणि निवडणूक यंत्रणा हातात असल्याशिवाय येणार नाही.”

“या कॉन्फिडन्सवरही कळस म्हणजे फडणवीसांनी ‘कुणी सोबत आलं तरी आणि कुणी सोबत नाही आलं तरी’, अशा शब्दांत आपल्याच मित्र पक्षांनाही इशारा देऊन एकप्रकारे त्यांनाही भाजपामागे फरपटत यावंच लागेल, असा दम भरला. हाच आहे खरा भाजपाचा अक्राळविक्राळ चेहरा. आता भाजपाच्या दोन्ही खांद्यांवर मान टाकलेले भाई आणि दादा स्वाभिमानी बाणा दाखवतात की मान कापली जाईल या भितीने भाजपाच्या मागे फरपटत जातात, हे बघावं लागेल.”

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले होते की “इथे जेवढे माध्यम प्रतिनिधी आहेत त्यांनी माझं म्हणणं लिहून घ्यावं, चित्रित करावं, या भाषणाच्या व्हिडीओ क्लिप साठवून ठेवाव्यात. काहीही झालं तरी मुंबईत महायुतीचा भगवा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही. मुंबई महापालिकेत महायुतीचा महापौर बसवल्याशिवाय आता भाजपाचा एकही कार्यकर्ता घरी जाणार नाही. कोणी सोबत आलं तरी किंवा कोणी सोबत आलं नाही तरी, कोणी कोणालाही सोबत घेतलं तरी महायुतीचाच महापौर होणार.”