उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अलीकडेच सरकारी आणि खासगी कर्मचाऱ्यांच्या वेतनावरून मोठं भाष्य केलं आहे. एका सरकारी कर्मचाऱ्याच्या पगारात तीन खासगी कर्मचारी काम करू शकतात, असं वक्तव्य अजित पवारांनी केलं. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांवर नाव न घेता टीका केली. एका आमदारावर, खासदारावर होणाऱ्या करोडो रुपयांच्या शासकीय खर्चात हजारो कर्मचारी काम करतील, असा टोला रोहित पवारांनी लगावला.

रोहित पवारांच्या टीकेला अजित पवार गटाचे प्रवक्ते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. सत्तेत सामील होण्यासाठी सर्वात आधी रोहित पवारांनीच समर्थन दिलं होतं, असा गौप्यस्फोट अमोल मिटकरी यांनी केला आहे. त्यांनी ‘एक्स’वर (ट्विटर) पोस्ट लिहून रोहित पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे.

हेही वाचा- “ओबीसींना राजकीय आरक्षण नको म्हणून भाजपाचे पदाधिकारी कोर्टात गेले”, रोहित पवारांचा गंभीर आरोप

रोहित पवारांना उद्देशून अमोल मिटकरी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हणाले, “दादा, आपण राजकारणात अजून लहान आणि नवखे आहात. ज्यांच्याविरुद्ध आपण बोलत आहात त्यांनी आपल्यापेक्षा अनेक उन्हाळे-पावसाळे जास्त पाहिलेले आहेत. सत्तेत सहभागी होताना सर्वप्रथम समर्थन आपलेच होते, याचा मी स्वतः साक्षीदार आहे. आता सरकारला सरकारचे काम करू द्या आणि स्वतःला सावरा.”

रोहित पवार नेमकं काय म्हणाले?

रोहित पवार यांनी ‘एक्स’ (ट्विटर) अकाऊंटवर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलं, “एका सरकारी कर्मचाऱ्याच्या पगारात तीन कंत्राटी कर्मचारी काम करतील, या आशयाचे एका बड्या नेत्याचे वक्तव्य ऐकून व बदलती भूमिका बघून आश्चर्य वाटलं. याचदृष्टीने विचार केला तर एका आमदारावर, खासदारावर होणाऱ्या करोडो रुपयांच्या शासकीय खर्चात हजारो कर्मचारी काम करतील.”

हेही वाचा- सर्वपक्षीय बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांकडून भूमिका स्पष्ट; म्हणाले, “मराठा समाजाला आरक्षण देण्यास…”

“बंडखोर आमदारांच्या सुरक्षेवर १५० कोटी खर्चासाठी, ‘शासन आपल्या दारी’च्या प्रत्येक सभेसाठी ८-१० कोटी व त्याच्या जाहिरातींवर ५२ कोटी, सरकारने गेल्या वर्षी केलेल्या कामांची यावर्षी जाहिरात करण्यासाठी शेकडो कोटी खर्च केले, पण अशावेळी काटकसर करावी, असा विचार शासन कधी करत नाही. शासकीय खर्चाची उधळपट्टी शासनाला चालते. मग नोकर भरतीसाठीच शासन एवढा बारीक विचार का करते?” असा सवालही रोहित पवारांनी विचारला.

हेही वाचा- “एका बड्या नेत्याचं…”, ‘त्या’ विधानावरून रोहित पवारांची अजित पवारांवर अप्रत्यक्ष टीका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अजित पवार नेमकं काय म्हणाले होते?

शासकीय कर्मचार्‍यांच्या वेतनावर होणारा खर्च प्रचंड असून एका कर्मचार्‍याच्या पगारात खासगी कंपनीचे तीन-तीन कर्मचारी काम करू शकतात. राज्याचे वार्षिक बजेट साडेपाच ते सहा लाख कोटींचे असून यापैकी २ लाख ४० हजार कोटींचा खर्च केवळ वेतनावर होतो, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी व्यक्त केले.