लोकसभेच्या सोलापूर जागेबाबत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केलेल्या विधानानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये सुप्त संघर्ष निर्माण झाला आहे. काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनीदेखील रोहित पवार पहिल्यांदाच आमदार झाले आहेत, त्यामुळे त्यांच्यात अजूनही तो पोरकटपणा आहे, अशी परखड प्रतिक्रिया दिली. शिंदे यांच्या याच विधानामुळे आता राष्ट्रवादीने आक्रमक पवित्रा धारण केला आहे. रोहित पवार यांचे समर्थक तसेच कार्यकर्ते रोष व्यक्त करत आहेत. असे असतानाच रोहित पवार यांनी एक खास ट्वीट करत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. प्रणिती शिंदे या माझ्या मोठ्या भगिनी असून त्यांना बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे, असे रोहित पवार म्हणाले आहेत.

प्रणिती शिंदे माझ्या मोठ्या भगिनी, त्यांना…

सोलापूर जागेसंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे निर्माण झालेल्या संघर्षाला थांबवण्याचा प्रयत्न रोहित पवार यांनी केला आहे. त्यासाठी त्यांनी एक खास ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये “आमदार प्रणिती शिंदे ताईंच्या वक्तव्यावरून नाराज झालेले कार्यकर्ते आपला राग व्यक्त करत आहेत. पण कुणीही नाराज होऊ नये. त्या माझ्या मोठ्या भगिनी असून त्यांना बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यामुळं आपापसात वाद न करता बेरोजगारी हा आजचा मुख्य प्रश्न सोडवण्यासाठी आपण आपली शक्ती खर्च करूया,” अशी संयमी भूमिका रोहित पवार यांनी घेतली आहे.

प्रणिती शिंदे काय म्हणाल्या?

सोलापूर लोकसभेच्या जागेसंदर्भात विधान करणारे आमदार रोहित पवार कोण? असा प्रतिसवाल काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्षा, आमदार प्रणिती शिंदे यांनी केला आहे. रोहित पवार हे पहिल्यांदाच आमदार झाल्यामुळे कदाचित अजून त्यांच्यात पोरकटपणा असेल, असे परखड विधान प्रणिती शिंदे यांनी केले.

रोहित पवार काय म्हणाले?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोलापूर लोकसभा राखीव मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांना सलग दोनवेळा पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत सोलापूरची राखीव जागा काँग्रेसने स्वतः न लढविता राष्ट्रवादीला द्यावी, अशी मागणी या पक्षाच्या स्थानिक पातळीवर होत आहे. अलिकडेच रोहित पवार यांनीही सोलापूर भेटीत, सोलापूर लोकसभेची जागा कोणी लढवायची, याचा निर्णय महाविकास आघाडीच्या बैठकीत होईल, असे विधान केले होते. त्यांनी सोलापूर लोकभा जागेवर अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादीचा दावा सांगितल्यामुळे सोलापुरात दोन्ही काँग्रेसमध्ये वादाला तोंड फुटले आहे.