काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केल्याचा दावा करत भारतीय जनता पार्टीने राज्यभर वीर सावरकर गौरव यात्रा काढली आहे. ही गौरव यात्रा काल नागपूरमध्ये पोहोचली. या यात्रेच्या समारोपावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि अनेक वरिष्ठ भाजपा नेत्यांची भाषणं झाली. या भाषणावेळी मंचावर पहिल्या रांगेत देवेंद्र फडणवीसांच्या शेजारी बसलेल्या एका भाजपा नेत्याने सर्वांचं लक्ष वेधलं. तो नेता म्हणजे सुधांशू त्रिवेदी. भाजपाचे राज्यसभा खासदार आणि प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारं वक्तव्यं केलं होतं. या वक्तव्यामुळे राज्यभर त्रिवेदी यांचा निषेध करण्यात आला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या त्रिवेदी यांना भाजपाने दिलेला सन्मान पाहून विरोधी पक्षांनी भाजपावर टीकेजी झोड उठवली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजपा आणि देवेंद्र फडणवीसांना या घटनेवरून लक्ष्य केलं आहे. रोहित पवार यांनी एक ट्वीट केलं आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, भाजपाचा प्रवक्ता सुधांशू त्रिवेदी याने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल संतापजनक वक्तव्य केलं तेव्हा भाजपाने त्याचा एका ब्र शब्दानेही निषेध केला नाही. ना त्यांनी राज्यात कुठे छत्रपती शिवाजी महाराज गौरव यात्रा काढली. पण याच भाजपाने आज नागपूरमध्ये सावरकर गौरव यात्रेत महाराष्ट्राच्या नाकावर टिच्चून सुधांशू त्रिवेदीला व्यासपीठावर पहिल्या रांगेत बसवत महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ चोळलं आणि महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांचा आम्ही सन्मान करतो हाच संदेश दिला. शिवरायांना आराध्य दैवत मानणारा महाराष्ट्र भाजपाची ही चाल कधीच विसरणार नाही!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्रिवेदींचं वक्तव्य काय?

भाजपा प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी राहुल गांधींच्या सावरकरांवरील वक्तव्याला विरोध करत काँग्रेसवर निशाणा साधला होता. एका हिंदी वृतवाहिनीचा चर्चासत्रात त्यांनी छत्रपती शिवाजी महारांजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्रिवेदी म्हणाले होते की, छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील औरंगजेबाची पाच वेळा पत्र लिहून माफी मागितली होती. काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी त्रिवेदी यांचा निषेध नोंदवला होता.