लेह लडाखमधील सियाचिन ग्लेशियर या सर्वाधिक उंच बर्फाळ प्रदेशात कर्तव्यावर असताना बुलढाण्याच्या पिंपळगाव सराई गावातील रहिवासी असलेल्या अग्निवीर जवानाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. त्यांच्या पार्थिवावर आज (सोमवार, २३ ऑक्टोबर) त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. अक्षय लक्ष्मण गवते असं या अग्निवीराचं नाव आहे. जेमतेम २२ वर्षे वय असलेल्या जवानाने देशासाठी आपला जीव गमावला. रविवारी संध्याकाळी त्यांचं पार्थिव घेऊन येणारं विमान छत्रपती संभाजीनगर येथे दाखल झालं. आज पहाटे साडेपाचच्या सुमारास हे पार्थिव लष्करी वाहनाने पिंपळगाव सराई येथे नेण्यात आलं.

अग्निवीर अक्षय गवते यांच्या पार्थिवावर काही वेळाने शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात येणार आहे. अग्निवीर गवते हे ३० डिसेंबर २०२२ रोजी युनिट ६९ मैदानी रेजिमेंटमध्ये भरती झाले होते. ‘टेलिफोन ऑपरेटर’ म्हणून सियाचिन ग्लेशियर भागात ते कर्तव्यावर होते. त्यांनी सैन्यात ९ महिने २१ दिवस सेवा दिली.

दरम्यान, अक्षय गवते हे अग्निवीर असल्याने त्यांना कोणतीही पेन्शन मिळणार नाही. तसेच कुठलेही सरकार लाभ मिळणार नाहीत. त्यामुळे अग्निवीर या सरकारी योजनेवर टीका होत आहे. अक्षय गवतेंच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.

हे ही वाचा >> जुनी पेन्शन योजना लागू करणार; विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे आश्वासन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रोहित पवार यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे, जगातील सर्वांत ऊंच युद्धभूमी असलेल्या सियाचिनमध्ये देशाचं रक्षण करणारा महाराष्ट्राचा सुपूत्र ‘अग्निवीर’ अक्षय लक्ष्मण गवते हा शहीद झाला. देशरक्षणासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या या वीराला माझी भावपूर्ण श्रद्धांजली! दुर्दैवाची बाब म्हणजे अग्निवीर असल्याने देशासाठी बलिदान देऊनही गवते यास ना पेन्शन मिळणार, ना इतर सरकारी लाभ मिळणार. पंजाबमधील एक अग्निवीर शहीद झाल्यानंतर त्याच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले नसल्याचा अनुभव आपण नुकताच घेतलाय. ‘अग्निवीर’ ही देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या जवानांची अवहेलना करणारी योजना असल्याने त्यांचा सन्मान राखण्यासाठी आपण सर्वांनीच या योजनेला कडाडून विरोध करायला पाहीजे.