गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. अजित पवार ‘नॉट रिचेबल’ असल्याच्या बातम्याही प्रसारमाध्यमांतून समोर येत होत्या. या सर्व घटनाक्रमानंतर अजित पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली. मी राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच आहे. जिवात जीव असेपर्यंत मी राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच काम करणार, असंही अजित पवार म्हणाले होते.

दरम्यान, महाराष्ट्रात विविध ठिकाणी ‘भावी मुख्यमंत्री’ असा उल्लेख असलेले अजित पवारांचे काही बॅनरही लावले आहेत. अशी एकंदरीत राजकीय स्थिती असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवारांमध्ये मुख्यमंत्री बनण्याची क्षमता आहे. ते मुख्यमंत्री बनले तर महाराष्ट्राला फायदाच होईल, असं विधान रोहित पवारांनी केलं, ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.

हेही वाचा- “भाकरी फिरवली पाहिजे याचा अर्थ अजितदादांना दूर केलं पाहिजे”, शरद पवारांच्या विधानावर शिवसेना नेत्याची प्रतिक्रिया

भावी मुख्यमंत्री म्हणून अजित पवारांच्या नावाच्या चर्चेबाबत विचारलं असता रोहित पवार म्हणाले, “अजित पवारांना मुख्यमंत्रीपद मिळालं, तर महाराष्ट्राला फायदाच होईल. कारण आजच्या नेत्यांच्या तुलनेत अजित पवारांची प्रशासनावर मजबूत पकड आहे. त्यामुळे कुठलंही काम लवकरात लवकर कसं होईल आणि सामान्य लोकांना न्याय कसा मिळेल? हे आपण अजित पवारांकडून शिकू शकतो. हे समीकरण महाराष्ट्रात बसवायचं असेल तर महाविकास आघाडीचे सर्व नेते आणि पक्ष एकत्र बसून हे ठरवतील. त्यानंतर त्याची अंमलबजावणी केली जाईल. आमदार किंवा एक कार्यकर्ता म्हणून मला विचारलं तर मी एवढंच सांगेन अजित पवारांमध्ये मुख्यमंत्री बनण्याची नक्कीच क्षमता आहे.”

हेही वाचा- रोहित पवारांना पाडण्यासाठी अजित पवारांनी लावली ‘फिल्डिंग’? शिंदे गटाच्या नेत्याचा गौप्यस्फोट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“अजित पवार मुख्यमंत्री होणारच” – अमोल मिटकरी

दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनीही अजित पवार मुख्यमंत्री बनणार असल्याचं भाकित केलं होतं. “सध्याच्या घडीला महाराष्ट्राचं राजकारण सांभाळू शकेल, असा अजित पवारांसारखा दुसरा तोलामोलाचा नेता महाराष्ट्रात नाही, हे दस्तुरखुद्द अमित शाह यांनी कबुल केलं आहे. अजित पवार हे मुख्यमंत्री होणारच आहेत. वेट अँड वॉच. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे आणि अजित पवार मुख्यमंत्री पदावर दिसतील,” असं विधान मिटकरी यांनी केलं होतं.