शिंदे गटाचे नेते आणि ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत रोहित पवारांना पाडण्यासाठी अजित पवार हे अनेकांना फोन करत होते, असा दावा नरेश म्हस्के यांनी केला आहे. नरेश म्हस्के यांच्या दाव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. खरं तर, ८ जानेवारी २०२३ रोजी एमसीए अर्थात महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत रोहित पवार अध्यक्ष पदासाठी निवडणुकीत उभे होते. या निवडणुकीत रोहित पवारांना पाडण्यासाठी स्वत: अजित पवार यांनी अनेकांना फोन केले, असा खळबळजनक आरोप नरेश म्हस्के यांनी केला आहे. अजित पवारांनी अलीकडेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. संबंधित टीकेला उत्तर देताना नरेश म्हस्के यांनी हा गौप्यस्फोट केला. ते ठाणे येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. हेही वाचा- पुणे : रोहित माझ्या मुलासारखा, त्याच्याबाबत मी असे करूच शकत नाही ; अजित पवार यांची स्पष्टोक्ती नरेश म्हस्के नेमकं काय म्हणाले? अजित पवारांवर आरोप करताना नरेश म्हस्के म्हणाले, "क्रिकेट कन्ट्रोल बोर्डाची निवडणूक होती. या निवडणुकीत रोहित पवार उमेदवार म्हणून उभे होते. आपण माहिती काढा, पवार कुटुंबातील कुठली व्यक्ती 'रोहित पवारांना पाडा' म्हणून सगळ्यांना निरोप देत होती. अजित पवार, तुम्ही आधी आपलं बघा. आपलं घरातलं बघा. नंतर मुख्यमंत्र्यांवर टीका करण्याचा प्रयत्न करा. रोहित पवारांना पाडण्यासाठी आपण कुणाकुणाला फोन केले होते? कुणाला निरोप दिले होते? हे आधी सांगा. त्यानंतर आमच्यावर टीका करा."