डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या १४ ट्वीट्समध्ये शरद पवार यांच्यावर अनेक मुद्द्यांवरून आरोप करण्यात आले होते. त्यामध्ये १९९३ साली मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांसंदर्भात दिलेल्या माहितीबाबत देखील प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे. हा मुस्लिमांचं लांगुलचालन करण्याचा प्रकार असल्याचा दावा देखील देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून विरोधकांना प्रत्युत्तर दिलं आहे.

रोहित पवारांनी शेअर केला जुना व्हिडीओ!

रोहित पवार यांनी आज सकाळी केलेल्या ट्वीटमध्ये शरद पवारांची एका वृत्तवाहिनीसाठी दिलेल्या मुलाखतीमधील एक क्लिप शेअर केली आहे. या क्लिपमध्ये पवारांना बॉम्बस्फोटाबाबत केलेल्या त्याच विधानाविषयी विचारणा करण्यात आल्यानंतर त्यांनी त्यावर खुलासा केला आहे.

नेमकं १२ मार्च १९९३ ला झालं काय?

शरद पवारांनी त्यावेळी मुस्लिम बहुल भागात देखील एक स्फोट झाल्याची चुकीची माहिती दिली होती. यासंदर्भात विचारणा केली असता त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं, यावर पवारांनी खुलासा केला आहे.

“बॉम्बस्फोट शुक्रवारी झाले. दुपारी १२च्या सुमारास. मी मंत्रालयात माझ्या कार्यालयात होतो. माझ्या कार्यालयापासून एअर इंडियाची बिल्डिंग अर्ध्या फर्लांगावर आहे. एअर इंडियाच्या तिथेच स्फोट झाले. माझ्या कार्यालयाच्या काचा हलायला लागल्या. माझ्या लक्षात आलं काहीतरी झालं. मी खिडकी उघडली तर तिथे धूर दिसायला लागला. मी कंट्रोल रुमला विचारलं तर बॉम्बस्फोट झाल्याचं समजलं. ५ मिनिटांत लागोपाठ इतर ठिकाणीही स्फोट झाल्याचं कळलं. मी स्पॉटवर जाऊन बघायचं ठरवलं. पण पोलीस आयुक्तांनी मला सांगितलं तुम्ही जागेवरून हलू नका, आम्ही स्पॉटवर जाऊन पाहातो”, असं शरद पवारांनी सांगितलं.

“होय, ते १०० टक्के खरं आहे”, मुंबई बॉम्बस्फोटांबाबत फडणवीसांनी केलेल्या आरोपांना शरद पवारांचं प्रत्युत्तर!

“काही तासांनी मी एअर इंडियाच्या स्पॉटला गेलो. त्यात आरडीएक्सचं मटेरियल वापरलं होतं. आरडीएक्स तयार करणारा कारखाना फक्त देहूरोडला आहे. मी संबंधित विभागाला विचारणा केली. पण आपल्याकडे दोन वर्षांपासून आरडीएक्स बनत नाही आणि स्टॉकही नाही असं मला कळलं. अर्थात आरडीएक्स इथलं नाही हे मला समजलं. मला लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितलं की शेजारच्या देशात आरडीएक्स बनतं. त्यामुळे शेजारी देशातून आरडीएक्स आल्याची शक्यता होती. बॉम्बस्फोट झाल्याची ठिकाणं ही हिंदूंची लोकसंख्या असणारी होती. याचा अर्थ हा नियोजित कट असला पाहिजे. भारतात हिंदू-मुस्लीम दंगल घडावी आणि मुंबई पेटलेली जगाला दिसावी असा त्यामागचा हेतू असावा असं मला वाटलं. त्यामुळे काहीही झालं तरी देशात हिंदू-मुस्लीम दंगा होता कामा नये म्हणून मी टीव्हीवर सांगताना मुस्लिम बहुल भागातही स्फोट झाल्याचं सांगितलं. त्यात मस्जिद बंदरचं खोटं नाव सांगितलं. मला सिग्नल द्यायचा होता की हे फक्त हिंदुंच्या नाही तर मुस्लिमांच्या भागातही घडलंय. बॉम्बस्फोटांमुळे हिंदू-मुस्लीम संघर्षाचं चित्र निर्माण होण्याची शक्यता होती. सुदैवाने ते झालं नाही”, असं शरद पवार या व्हिडीओमध्ये सांगताना दिसत आहेत.

रोहित पवारांचं खोचक ट्वीट!

पवारांची ही क्लिप शेअर करताना रोहित पवारांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. “शरद पवार खोटं बोलले असा आरोप विरोधकांनी केला. आम्ही म्हणतो हो बोलले! पण ते का खोटं बोलले? हे अपप्रचार करणाऱ्या लोकांपासून लपवून ठेवायचंय! खास त्यांच्यासाठी हा व्हिडीओ”, असं रोहित पवार यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शरद पवारांनी अनेकदा आपल्या मुलाखती आणि पत्रकार परिषदांमधून यासंदर्भात खुलासा केला आहे.