Rohit Pawar On Mahayuti: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तथा आमदार रोहित पवार हे सातत्याने महायुती सरकारवर जोरदार टीका करत आहेत. दरम्यान आता महायुती सरकारमधील पाच हजार कोटींचा घोटाळा उघडकीस आणणार असल्याचा इशारा आमदार रोहित पवार यांनी दिला आहे. या संदर्भातील माहिती रोहित पवार यांनी एक्सवर (ट्विटर) पोस्ट करत दिली आहे. तसेच सोमवारी (१८ ऑगस्ट) पत्रकार परिषदेत ५ हजार कोटींच्या घोटाळ्याचा पर्दाफाश करणार असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

रोहित पवारांनी काय म्हटलं?

“मातृभूमीशी गद्दारी करुन इंग्रजांना मदत करणाऱ्या कुटुंबाच्या वारसदारांच्या घशात ५ हजार कोटींचा मलिदा… वर्तमानातील गद्दारांची इतिहासातल्या गद्दारांशी हातमिळवणी. ‘गँग्ज ऑफ गद्दार’चा पर्दाफाश करण्यासाठी भेटू उद्या (सोमवार) पत्रकार परिषदेत… सकाळी ९.३० वाजता. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष कार्यालय बॅलार्ड इस्टेट, मुंबई”, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

रोहित पवारांनी कोकाटेंचा रमी खेळतानाचा व्हिडीओ आणला होता समोर

दरम्यान, आमदार रोहित पवारांनी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा रमी खेळतानाचा व्हिडीओ समोर आणला होता. मंत्री माणिकराव कोकाटे यांचा रमी खेळतानाचा व्हिडीओ ट्विट करत रोहित पवारांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली होती. त्यानंतर विरोधकांनी माणिकराव कोकाटे यांच्यावर टिकेची झोड उठवली होती. त्यानंतर अखेर माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषीमंत्रिपद काढून घेण्यात आलं आणि कृषी मंत्रिपदाची जबाबदारी दत्तात्रय भरणे यांच्याकडे देण्यात आली तर माणिकराव कोकाटे यांच्याकडे क्रीडा मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे.

अजित पवारांनी नुकतंच रोहित पवारांना खडसावलं होतं

‘अजित पवार गावकीचा विचार करतात, पण भावकीला मात्र ते विसरले’, असे विधान उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुतणे आमदार रोहित पवार यांनी त्यांच्यासमोरच विधान केलं होतं. सांगलीतील इस्लामपूर येथे महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या प्रा. डॉ. एन. डी. पाटील विधी महाविद्यालय, श्रीमती सरोज नारायण पाटील मानसशास्त्र संशोधन केंद्र आणि प्रा. डॉ. एन. डी. पाटील बहुउद्देशीय सभागृहाचा उद्घाटन सोहळ्याच्या कार्यक्रमानिमित्त दोन्ही पवार एकत्र आले होते.

यावेळी राष्ट्रवादी (शरद पवार) काँग्रेसचे नेते जयंत पाटील, सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हेदेखील व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी रोहित पवार आपल्या भाषणात म्हणाले होते की, अजित पवार हल्ली गावकीचा विचार करतात. मात्र भावकीला ते विसरले. रोहित पवार यांनी डिवचल्यानंतर अजित पवारांनींही आपल्या भाषणात यावर पलटवार केला. अजित पवार म्हणाले, “भावकीकडे लक्ष दिले म्हणूनच तू आमदार झालास. जयंतराव त्याला (रोहित पवार) विचारा किती मते पडली? पोस्टल बॅलेटमध्ये आपण (रोहित पवार) निवडून आला आहात. त्याच्यामुळे माझ्या नादी कुणी लागू नका.”