विश्वास पवार, लोकसत्ता

वाई: गुलाबाचे फूल आणि प्रेमाचे नाते हे जगभर सर्वश्रुत आहे. पण याच गुलाबावर प्रेम करत साताऱ्यातील म्हसवे गावाने आपल्या शेतीचा हा मुख्य विषय बनवला आहे. एका शेतकऱ्याने फुलवलेली ही गुलाबशेतीची चळवळ आता परिसरातील १५० हून अधिक शेतकऱ्यांनी अंगीकारली असून, गुलाब फुलांच्या विक्रीसोबतच त्यापासून गुलकंद, गुलाब अत्तर, सिरप बनवण्याच्या प्रक्रिया उद्योगातही गावातील शेतकऱ्यांनी भरारी घेतली आहे.

Water scarcity, Badlapur, Ambernath,
बदलापूर, अंबरनाथमध्ये शुक्रवार, शनिवारी पाणीबाणी; तातडीच्या कामांसाठी बॅरेज जलशुद्धीकरण केंद्र १२ तास बंद
Jalgaon Massive Explosion, Maurya Chemical Company, 20 Employees Injured, jalgaon midc, fire in Maurya Chemical Company, marathi news, fire in jalgaon, jalgaon news
जळगावात अग्नितांडव; रसायन कंपनीत स्फोट; २० पेक्षा अधिक कामगार गंभीर
धूळ नियंत्रण वाहनांमुळे नागरिकांबरोबरच झाडांचाही मोकळा श्वास
Buying a house on the occasion of Gudi Padwa 2024
गुढीपाडव्यानिमित्त खरेदीचा उत्साह; घरखरेदीची कोट्यवधींची गुढी, वाहनांची आगावू नोंदणी, सराफा बाजारात गर्दी

म्हसवे हे साडेतीन हजार लोकसंख्येचे गाव. साधारण १० वर्षांपूर्वी या गावातही पारंपरिक पिकांची शेती केली जात होती. परंतु २०१२ मध्ये गावातील एक उच्चशिक्षित शेतकरी सचिन शेलार यांनी नोकरीला फाटा देत प्रयोगशील शेतीचे स्वप्न पाहिले आणि गावात प्रथमच त्यांनी त्यांच्या तीन एकर क्षेत्रावर देशी-परदेशी गुलाबाची शेती फुलवली. परदेशी गुलाब प्रेमाचे प्रतीक बनून शहरात विक्रीसाठी जाऊ लागला, तर देशी गुलाबाचे महत्त्व लक्षात घेत गुलकंद, गुलाब अत्तर, गुलाब सिरपउत्पादक गावात येऊ लागले. फुलेविक्री आणि त्या जोडीनेच प्रक्रिया उद्योगासाठीही फुलांची विक्री सुरू झाल्याने त्यांची ही गुलाबशेती वर्षभरासाठी गुलाबी बनली. आवश्यक ती काळजी घेत त्यांनी उत्पादनात वाढ तर केलीच, सोबतच बाजारपेठेचा अंदाज घेत उत्पन्नही वाढवले.

आणखी वाचा-निवडणुकीसाठी मतपेरणीचा ‘मार्ग’ ; रस्ते विकासासाठी सात हजार कोटी रुपये; ग्रामविकास विभागाची योजना

शेलार यांचे गुलाब शेतीतील हे यश पाहून परिसरातील अन्य शेतकरीही मग या गुलाबाच्या प्रेमात पडू लागले. सुरुवातीला पाच-दहा शेतकऱ्यांपर्यंत असलेली ही संख्या हळूहळू वाढत जाऊन तब्बल दीडशे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली आहे. काही दिवसांतच ही एक चळवळ बनली. पुढे या चळवळीनेच ठरवले, की फुलांची केवळ विक्री करण्यापेक्षा त्या जोडीने प्रक्रिया उद्योगातही उतरायचे. त्यासाठी आवश्यक प्रशिक्षण घेऊन गावातच यंत्रणा उभी केली. आणि कालपर्यंत केवळ गुलाबाची फुले विकणारे हे गाव आता गुलाब फुलांच्या प्रक्रिया उद्योगातही स्वयंपूर्ण झाले आहे. म्हसवे गावातच आता गुलाब शेतीसोबत गुलकंद, गुलाब अत्तर, गुलाब सिरप ही उत्पादनेही घेतली जातात. गेल्या केवळ एक वर्षात गावाने २५ टन गुलकंद आणि तेवढ्याच गुलाब सिरपची विक्री केली आहे. या उत्पादनांची आता निर्यातही होऊ लागली आहे. गुलाब अत्तर बनवण्यातही आता गावाने उडी घेतली आहे. गुलाबासोबतच निशिगंध, जर्बेरा, चमेली, ऑर्किड आदी अन्य शोभेच्या फुलांच्या उत्पादनातही गावाने पाय रोवले आहेत. ही सगळी आकडेवारी आणि तपशील ऐकले, तरी म्हसवे गावच्या गुलाबकथेतील सुगंध दरवळल्याशिवाय राहत नाही.

आणखी वाचा-सांगली : घरफोडी करणाऱ्या दोघांना अटक, २८ लाखाचा ऐवज हस्तगत

‘व्हॅलेंटाइन’साठी पन्नास हजार गुलाब

गुलाब फुलांची विक्री तर इथल्या शेतीचा स्थायिभाव. ‘व्हॅलेंटाइन डे’, गणेशोत्सव, नवरात्रौत्सव, दिवाळी, लग्नाचा हंगाम, मान्यवरांचे वाढदिवस या काळात म्हसवेतून हजारो परदेशी गुलाबांची विक्री होते. यंदा ‘व्हॅलेंटाइन डे’साठी या एका गावातून तब्बल पन्नास हजारहून अधिक गुलाब पुण्या-मंबईच्या बाजारपेठेत विक्रीसाठी गेले आहेत.

सुरुवातीला काही गुलाबाची रोपे लावून या शेतीच्या जोडधंद्याला सुरुवात केली. यातून एकेक शेतकरी जोडत आज आम्ही दीडशे गुलाबउत्पादक एकत्र आलो आहोत. केवळ गुलाबाच्या उत्पादनावर न थांबता, त्याची विक्री, विपणन, त्यापासून तयार होणारे उपपदार्थनिर्मिती यामध्येही आम्ही प्रवेश केला आहे. यासाठी आवश्यक कौशल्य आत्मसात केली आणि व्यवस्था उभी केली आहे. केवळ उत्पादनावर लक्ष केंद्रित न करता या अन्य बाबींकडेही लक्ष दिल्याने म्हसवेची ही गुलाब चळवळ आज यशस्वी झाली आहे. -सचिन शेलार, म्हसवे