RSS Leader Sunil Ambekar on Hindi Landauge Row : “राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) मते देशातील सर्व भाषा या राष्ट्रीय भाषा आहेत”, असं वक्तव्य संघाचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख सुनील आंबेकर यांनी केलं आहे. प्रत्येकाला त्याच्या मातृभाषेत प्राथमिक शिक्षण मिळालं पाहिजे, असंही आंबेकर यांनी म्हटलं आहे. या वक्तव्यासह आरएसएसने महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारच्या मतांपासून वेगळी भूमिका मांडली आहे. दरम्यान, संघाने फडणवीस सरकारचे कान टोचले हे बरं केलं अशी प्रतिक्रिया विरोधकांकडून उमटत आहे.

सुनील आंबेकर म्हणाले, “राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची खूप आधीपासूनच भूमिका आहे की भारतातील सर्व भाषा या राष्ट्रीय भाषा आहेत. देशातील वेगवेगळ्या भागात राहणारे लोक तिथली भाषा, आपापली मातृभाषा बोलतात. त्यामुळे मुलांना प्राथमिक शिक्षण हे त्यांच्या मातृभाषेतच मिळालं पाहिजे असा आग्रह असतो. मातृभाषेत शिक्षण ही गोष्ट खूप आधीपासूनच ठरलेली आहे.”

संघाने फडणवीस सरकारचे कान टोचले ते बरं केलं : आव्हाड

दरम्यान, आरएसएसने भाषावादावर आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “संघ एनडीएत फायर इंजिनप्रमाणे काम करतो. त्यावरून त्यांनी सरकारचे कान टोचले ते बरं केलं.”

सरकारचा भाषेवरून वाद सुरू करण्याचा प्रयत्न; आव्हाडांचा आरोप

जितेंद्र आव्हाड म्हणाले, “मुळात भाषा हा सगळ्यांचा ममत्वाचा विषय आहे, हा प्रत्येकाच्या हृदयाजवळचा विषय आहे. एखादं मूल आईच्या उदरातून बाहेर पडतं तेव्हा सर्वप्रथम ते आपल्या आईची भाषा शिकतं. आपल्याला ठेच लागते तेव्हा आपण ‘आई’ असंच बोलतो. मातृभाषेचं रक्ताशी नातं असतं. त्यामुळे हे सरकार उगाच मातृभाषेशी मस्ती का करतंय ते मला कळत नाहीये. सरकारला भाषेवरून लोकांमध्ये भांडण लावायची खाज सुटली आहे, ती बंद व्हायला हवी. आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्यांचे कान टोचले आहेत. त्यामुळे आता हे सगळं आपोआप बंद होईल अशी अपेक्षा आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सरकारमुळे भाषावाद सुरू झाल्याची टीका

देवेंद्र फडणवीस सरकारने राज्यातील शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा शिकण्याची सक्ती केली होती. मात्र, जनतेच्या विरोधानंतर सरकारला हा निर्णय रद्द करावा लागला. परंतु, गेल्या काही दिवसांत यामुळे राज्यात भाषावाद पेटला आहे. हिंदी व मराठी भाषेवरून वाद चालू झाल्याची टीका विरोधकांकडून होऊ लागली आहे.