केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी संघ-भाजप हिंदू दहशतवाद्यांची शिबिरे चालवित असल्याचे विधान केल्याने संघ परिवाराच्या शाखांमध्ये अस्वस्थता पसरली असून शिंदेंच्या विधानावर संघ वर्तुळातून अत्यंत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काँग्रेसमधील नेतृत्त्व फेरबदल आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या अध्यक्षपदाचा टप्पा दुसरा टप्पा असे दुहेरी निमित्त साधून सुशीलकुमार शिंदे यांनी संघ परिवारावर शरसंधान केले आहे. त्यावर अ.भा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रसिद्धी प्रमुख मनमोहन वैद्य यांनी तीव्र आक्षेप घेतला असून शिंदेच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करीत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. दहशतवादाला कोणताही धर्म नाही. त्यामुळे दहशतवादाचा संबंध धर्माशी जोडला जाऊ नये, ही संघाची प्रारंभापासूनची भूमिका आहे. गृहमंत्री शिंदे यांनी दहशतवादी घटनांचा तपास प्रभावित करण्यासाठी हे विधान केले आहे. एमआयएमचा आमदार अकबरुद्दीन ओवेसी देशद्रोही भाषणे करून धार्मिक तेढ निर्माण करीत असताना गृहमंत्री शिंदे यांनी तोंड उघडले नव्हते. त्याच्याविरोधात ठोस पुरावे असताना कारवाईला विलंब लावण्यात आला. संसदेवर हल्ला करणाऱ्या अफजल गुरूची फाशी टाळली जात आहे, यावर शिंदे यांनी जाहीरपणे बोलावे, असे आव्हान मनमोहन वैद्य यांनी केले.
काँग्रेसचे अन्य कोणत्या नेत्याने असे विधान केले असते तर त्याची संघाने दखलही घेतली नसती. परंतु, देशाच्या गृहमंत्र्यांना असे विधान करण्याचे सुचावे हे देशाचे दुर्दैव आहे, अशी टीका संघाचे प्रवक्त राम माधव यांनी केली.
विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्षध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया गृहमंत्री शिंदेंवर चांगलेच बरसले आहेत. मुंबईवर खुलेआम हल्ला करणारे पाकिस्तानी दहशतवादी आणि भारतीय सैनिकाचे शिर कापून नेणारे पाकिस्तानी सैनिक यांच्याबद्दल मौन बाळगणारे सुशीलकुमार शिंदे हिंदुत्त्ववाद्यांवर आरोप करण्यासाठी कचरत नाहीत. हिंदू संघटनांना बदनाम करण्याचाच हा नियोजित कट असून यापुढे शिंदेंना संतुलन राखून बोलावे, असा इशारा तोगडियांनी यांनी दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
More Stories onआरएसएसRSS
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rss strongly condemn shinde statement
First published on: 22-01-2013 at 01:35 IST