शहरातील कचऱ्याचा प्रश्न मार्गी लागला असून, कचऱ्यापासून खतनिर्मितीचा प्रकल्प दोन महिन्यांपासून पूर्ण क्षमतेने सुरू असल्याची माहिती महापालिका आयुक्त सुधाकर तेलंग यांनी दिली.
वरवंटी कचरा डेपोची आमदार अमित देशमुख यांनी बुधवारी पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना तेलंग यांनी महापालिकेने केलेल्या कामाची माहिती दिली. शहरातील कचरा ७-८ वर्षांपासून कचरा डेपोवर साठला होता. त्यामुळे वरवंटी परिसरातील नागरिकांना कचऱ्यामुळे अनेक बाबींना तोंड द्यावे लागत होते. नागरिकांनी हरित न्यायाधिकरणाकडे दाद मागितल्यानंतर महापालिकेने ४ महिन्यांत चांगली पावले उचलली आहेत.
परिसरातील ग्रामस्थांना कचऱ्यावरील माश्या, कुत्री व दरुगधी यांचा त्रास होत होता. महापालिकेने ‘ओडोफ्रेश’ रसायन चार महिन्यांपासून नियमित फवारल्यामुळे दरुगधी थांबली. माश्यांचा त्रास कमी झाला व कुत्र्यांची संख्या रोडावली. कचरा डेपोवरील कचरा वाऱ्याने उडून शेतकऱ्यांना त्याचा त्रास होत होता. महापालिकेच्या वतीने संपूर्ण कचरा डेपोला संरक्षण िभत बांधण्याचे काम सुरू झाले. त्यामुळे हाही त्रास लवकरच संपणार आहे. कचरा डेपोच्या परिसरात त्यांच्या मागणीनुसार ४५ खांब उभारून वीज उपलब्ध करण्यात आली. कचरा डेपोमुळे परिसरातील पाणी दूषित होत असल्याच्या तक्रारी होत्या. महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने कचरा डेपोच्या आजूबाजूच्या विहिरीचे व िवधन विहिरींचे पाणी तपासणी करून, कचऱ्यामुळे ते दूषित होत नसल्याचे मनपाला लेखी कळवले असल्याचे तेलंग यांनी सांगितले.
कचरा डेपोवरील बंद खतनिर्मितीची यंत्रसामग्री दुरुस्त करून दोन महिन्यांपासून दररोज दोन पाळय़ांमध्ये चालवली जाते. सुमारे ५० टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. शहरातून रोज १०० ते ११० टन कचरा गोळा केला जातो. दररोज येणारा कचरा न साठवता त्यावर प्रक्रिया करण्याची यंत्रणा मार्गी लागली. जुन्या साचलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यास थोडा कालावधी लागेल. त्यासाठी नवे तंत्रज्ञान वापरून प्रश्न मार्गी लावणार आहे.
राज्यातील २६ महापालिकांमध्ये कचऱ्याचा प्रश्न आहे. हा प्रश्न उत्तम हाताळणाऱ्या पहिल्या ९ महापालिका आहेत. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील महापालिकांत लातूरचा समावेश आहे. तिसऱ्या टप्प्यातील महापालिकेत मुंबई व औरंगाबादचा समावेश असल्याचे प्रदूषण मंडळाने प्रसिद्धीस दिलेल्या अहवालात म्हटले आहे. शहरात घरोघरी जाऊन कचरा गोळा करण्याची यंत्रणा महापालिकेने राबविली. यात ७० टक्के यश प्राप्त झाले. प्रत्येक प्रभागात दोन अॅपे वाहन उपलब्ध केले आहेत. आगामी महिनाभरात १०० टक्के यश प्राप्त होईल व त्यानंतर ओला-सुका कचरा वेगळा करण्याची सक्ती नागरिकांना केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
‘विकास’तर्फे तांत्रिक साहाय्य
कचऱ्यापासून खतनिर्मिती प्रकल्प महापालिकेने सुरू केला. तो किती दिवस चालेल? दीर्घकाळ चालवण्यासाठी कोणत्या उपाययोजना हव्यात? यासाठीचे सर्व तांत्रिक मार्गदर्शन विकास साखर कारखान्यातर्फे मोफत दिले जाणार आहे. प्रमाणित दर्जाच्या खतनिर्मितीनंतर महापालिकेकडे ते सुपूर्द केले जाईल. वारंवार येणाऱ्या अडचणींना तोंड देण्यासाठी कायम तांत्रिक मार्गदर्शन दिले जाणार असल्याचेही अध्यक्ष आमदार अमित देशमुख यांनी सांगितले.