Rupali Chakankar on Pranjal Khewalkar: राष्ट्रवादी (शरद पवार) काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांचे पती आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्याविरोधात एका महिलेचे लपून अश्लील व्हिडीओ शूट केल्याप्रकरणी आज पुणे सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आधी रेव्ह पार्टी प्रकरणात अटक झाल्यानंतर आता आणखी एक आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी माध्यमांशी बोलत असताना एक खळबळजनक दावा केला. खेवलकर यांच्या मोबाइल, लॅपटॉपमध्ये अनेक अश्लील व्हिडीओ सापडले असून एका मोठ्या सेक्स रॅकेटचा भांडाफोड होऊ शकतो, असा दावा चाकणकर यांनी केला.
पुण्यात माध्यमांशी बोलत असताना रुपाली चाकणकर म्हणाल्या, मानवी तस्करीविरोधात आयोगाने मोठी चळवळ उभी केली होती. दोन दिवसांपूर्वीच बांगलादेशी मुलींची वसई येथून सुटका केली. राज्यात अशाप्रकारच्या कुठेही घटना घडत असतील तर स्थानिक पोलीस ठाणे, भरोसा सेलला संपर्क साधावा.
खेवलकरांबद्दल काय म्हणाल्या?
“खेवलकर यांच्या मोबाइल, लॅपटॉप आणि पेन ड्राईव्हमध्ये काही अश्लील व्हिडीओ सापडले आहेत. याबद्दल पुणे पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६इ आणि भारतीय न्याय संहिता ७७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. संबंधित व्यक्तीची परवानगी न घेता अश्लील व्हिडीओ रेकॉर्ड करणे आणि त्याचा गैरवापर केल्याबद्दल हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे”, असेही रुपाली चाकणकर यावेळी म्हणाल्या.
मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता?
या प्रकरणात आणखी काही गुन्हे यापुढेही दाखल होण्याची शक्यता आहे. यातून फार मोठे सेक्स रॅकेट उघड होऊ शकते, असेही रुपाली चाकणकर म्हणाल्या. “याप्रकरणात आणखी काही पीडित महिला समोर येत आहेत. आता एका महिलेने तक्रार दाखल केली आहे. या पीडित मुलींना संरक्षण देण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. पीडित मुलींचे लैंगिक अवस्थेतील व्हिडीओ चित्रीत केले गेले आहेत. त्या मुलींचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे समुपदेशन करणे गरजेचे आहे. कारण या मुलींना समाज पुन्हा स्वीकारत नाही”, असेही चाकणकर म्हणाल्या.