Rupali Patil Thombare meet ajit pawar after disciplinary notice allegations on rupali chakankar marathi news | राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षातील रुपाली ठोंबरे पाटील आणि रुपाली चाकणकर यांच्यातील संघर्ष गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चेत आला आहे. चाकणकर या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष असून त्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष सुद्धा आहेत. आज रुपाली पाटील यांनी अजित पवार यांची भेट घेतली या भेटीत त्यांनी अजित पवारांकडे चाकणकरांची तक्रार केल्याची माहिती दिली आहे.

नेमकं वाद काय?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांच्या बाबत माधवी खंडाळकर यांनी मागील आठवड्यात सोशल मिडीयावर वादग्रस्त पोस्ट केली होती. त्यावरून रुपाली पाटील ठोंबरे यांची बहीण प्रिया सुर्यवंशी, वैशाली पाटील, पूनम गुंजाळ आणि अमित सुर्यवंशी या चौघांनी माधवी खंडाळकर यांना मारहाण केल्याची घटना घडली होती. त्या प्रकरणी रुपाली पाटील ठोंबरे यांची बहीण, मावशी यांच्यासह अन्य दोघांविरोधात खडक पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

यानंतर महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी माधवी खंडाळकर यांच प्रकरण पुढे आणले आहे. या पदाचा रुपाली चाकणकर यांनी गैरवापर केला आहे. त्या माध्यमातून माझ्या कुटुंबातील सदस्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप रुपाली पाटील ठोंबरे यांनी केला होता, यानंतर रुपाली पाटील यांना काल पक्षाकडून एक शिस्तभंगाची नोटीस पाठविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आज पाटील यांनी पक्षाचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याबद्दलही रुपाली पाटील ठोंबरे बोलल्या आहेत.

नोटीस नाही तर खुलासा पत्र

“मला पक्षाची नोटीस नाही तर पक्षाचे खुलासा पत्र काल रात्री दिले आहे. मी जे काही महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि महिला प्रदेश अध्यक्षा यांच्याबाबतीत माध्यमांमध्ये वक्तव्य केलं त्याचा खुलासा पक्षाने मागितला आहे. त्यासाठी सात दिवसांचा कालावधी दिला आहे. आणि कायदेशीर खुलासा मी देणार आहे,” असे रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या.

वादाचा प्रसंगाचा वाद पोलीस ठाण्यात गेल्यानंतर तो वाद संपवला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तातडीने माधवी खंडाळकर यांनी सीपींना तक्रार दिली आणि गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर मी पोलिसांकडे गेले आणि त्यांनी माधवी खंडाळकर आणि त्यांच्या भावावर गुन्हा दाखल केला आहे, असेही रुपाली पाटील म्हणाल्या.

तसेच माधवी खंडाळकरांचा गुन्हा कोणाच्या सांगण्यावरून दाखल करण्यात आला याचाही तपास व्हावा म्हणून सीपींकडे मी अर्ज केला आहे. हे कोणी प्लॅन केलं? कारण माधवी खंडाळकर यांच्याशी सहा वर्ष कसलाही संबंध नसताना अचानक त्यांनी…. फलटन महिला डॉक्टरचे जेव्हा राज्याच्या महिला आयोगाच्या अक्ष्यक्षा चारित्र्यहनन करत होत्या आणि त्यावर मीडियामध्ये टीकेची झोड उठली तेव्हा मी सांगितलं की पक्षाचं आणि महिला आयोगाचं कामकाज वेगळं आहे. पक्षाचा त्याच्याशी संबंधी नाही, त्याच २८ तारखेला माधवी खंडाळकर पोस्ट केली. ज्यामध्ये त्यांनी रुपाली पाटील यांना तुम्ही पद का दिलं? तुम्ही पक्षात का घेतलं? असं म्हटलं होतं, असेही रुपाली पाटील म्हणाल्या.

रुपाली चाकणकरांशी काही संबंध नाही असे सांगणारी महिला त्या भांडणाच्या वेळी चाकणकरांना फोन कसा करा म्हणते? असा प्रश्न रुपाली पाटील यांनी खंडाळकरांचा एक व्हिडीओ माध्यमांना दाखवत उपस्थित केला.

अजित पवारांना काय सांगितलं?

दोन्ही वाद पोलीसांकडे आहेत. पोलीस याचा तपास करतील. आणि अजित पवारांनी पालकमंत्री म्हणून सांगितलं आहे की यात कोण चुकलं? रुपाली पाटील चुकल्या? खंडाळकर चुकल्या आहेत की खंडाळकरांना चालवणाऱ्या चाकणकर चुकल्या आहेत याचा अहवाल पोलीस समोर ठेवतील, असेही रुपाली पाटील म्हणाल्या.

राज्य महिला आयोग हे संविधानिक पद आहे. तो पक्षाचा विभाग नाही, त्यामुळे राज्य महिला आयोगावर मी जे काही बोलले आहे ते कायदेशीररित्या पक्षाला लागू होत नाही. त्यामुळे त्यांनी मला जो खुलासा मागितला आहे तो मी करणार आहे, असेही रुपाली पाटील म्हणाल्या.

चाकणकरांबद्दल अजित पवारांकडे काय तक्रार दिली? याबद्दल बोलताना रुपाली पाटील म्हणाल्या की, “मी सांगितलं आहे की, जे राज्य महिला आयोग महिलांची सुरक्षितता, सक्षमता आणि त्यांचे मनोबल वाढवण्याचे काम सोडून महिलांबद्दलचं सोशल पोस्ट तयार करणे, त्यांना कुठल्यातरी प्रकरणात अडकवणे आणि महिलांचा छळ आणि शोषण करत आहे,” असेही रुपाली पाटील म्हणाल्या.