रवींद्र केसकर
अगंतुकपणे ओढवलेल्या करोनाच्या संकटाने आता शेती आणि शेतकऱ्यांना विळखा घालण्यास सुरुवात केली आहे. करोनामुळं पुकारलेला लॉकडाऊन आता टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांच्या मुळावर उठला आहे. तुळजापूर तालुक्यातील देवसिंगा तूळ येथील शेतकऱ्याचा आठ एकरातील टोमॅटोचा रेंधा झाला आहे. कारण, विक्रीअभावी सगळा माल जागेवर सडून जात आहे. एक दोन नव्हे तर तब्बल पन्नास लाख रुपयांचा टोमॅटोचा लाल चिखल शिवारात पसरला आहे. तर सात एकरावरील ढोबळी मिर्ची देखील सडून गेली आहे. मोठ्या कष्टाने पदरात पडलेल्या पिकाची ही अवस्था पाहून टोमॅटो उत्पादक राजाभाऊ रोचकरी हवालदिल झाले आहेत.
आठ ऐकरातील टोमॅटो सडत चालला आहे. टोमॅटोची झाडे काढून टाकण्यासाठी व पुन्हा मशागत करण्यासाठी चाळीस ते पन्नास हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. लाखो रुपयांचे नुकसान त्यात भविष्यातील मशागतीची चिंता रोचकरी यांच्या समोर आ वासून उभी आहे. डोळ्यासमोर पसरलेला लाल चिखल दूर करण्यासाठी जड मनाने राजाभाऊ कामाला लागले आहेत. आत पुढं काय करावं? हा प्रश्नदेखील त्यांना छळत आहे.
करोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी शासनाने संचारबंदी व लॉकडाउन लागू केला. यामुळे दळणवळण ठप्प झाले. परिणामी मोठ्या बाजार समित्या बंद पडल्या. त्याचा मोठा परिणाम भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. विशेषतः शेतकऱ्याचा हाताशी आलेला भाजीपाला विकता येत नसल्याने अनेकांची घुसमट होत आहे. डोळ्यादेखत शिवारात विक्रीअभावी पडून असलेला लाखो रुपयांचा टोमॅटो सडत आहे. तुळजापूर तालुक्यातील देवसिंगा तूळ येथील राजाभाऊ रोचकरी या परिस्थितीचे प्रातिनिधिक उदाहरण आहेत.
आणखी वाचा- क्वारंटाइनमधील ऊस तोड मजुरांकडे शासनाचे दुर्लक्ष; जेवणाच्या खर्चाबाबत आदेशच नाहीत
तुळजापूर तालुक्यातील देवसिंगा तूळ येथील रोचकरी यांनी आपल्या आठ ऐकर क्षेत्रात टोमॅटोची लागवड केली होती. दुष्काळी परिस्थितीशी दोन हात करीत योग्य नियोजनाच्या आधारे करुन टोमॅटोच्या शिवाराची चांगली जोपासना केली. त्यासाठी सुमारे बारा लाख रुपयांचा नगदी खर्च आला, कष्टाला फळ आले. नजरेत भरणार नाही असा टोमॅटो प्लॉट तयार झाला. सोलापूर येथील बाजारपेठेत विक्री जोरात सुरू झाली आणि पहिल्याच घासाला खडा लागावा तशी अवस्था रोचकरी यांच्या वाट्याला आली. विक्रीस आरंभ होताच करोना आला आणि आडत मार्केट बंद झाले, वाहनेही बंद झाली. त्यामुळे मागील महिनाभरापासून टोमॅटो शिवारात सडून जात आहेत.
आणखी वाचा- चंद्रपूर : सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, मास्क न वापरल्याबद्दल ७८ हजारांचा दंड वसूल
डोळ्यादेखत लाखो रुपयांच्या टोमॅटोचा लाल चिखल झाला आहे. एका झाडाला साधारण १३० किलो टोमॅटो लागतात. एक किलोला सरासरी ३ ते ४ रुपये ठोक भाव मिळाला तरी साधारणपणे चाळीस ते पंचेचाळीस लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित होते. बाजार बंद झाला, वाहतूक व्यवस्था जागच्या जागी थांबली. त्यामुळे लाखो रूपयांच्या उत्पन्नवर पाणी पडले आहे. सध्या आठ एकरात सडक्या टोमॅटोचा सडा पडला आहे. ही घाण काढून पुन्हा रान तयार करण्यासाठी चाळीस हजार खर्च करावा लागणार आहे. एकीकडे भलेमोठे नुकसान आणि समोर भविष्यातील खर्चाचे गणित उभे त्यामुळे आता काय करावे? या प्रश्नाने रोचकरी यांना भेडसावून टाकले आहे.
मदतीशिवाय उभं राहणं कठीण – रोचकरी
दुष्काळ अतिवृष्टी आदी संकटातून कशीबशी टोमॅटोची शेती वाचवली होती. मात्र, यंदा करोनाच्या संकटाने त्याची पुरती वाट लावली. आता जगावे कसे? हा प्रश्न पडला आहे. आमच्या या पिकाचे पंचनामे करुन मदत दिल्याशिवाय आम्हाला नव्याने शेती करणे शक्य होणार नाही. शासनाच्या मदतीशिवाय आम्हाला पुन्हा उभं राहणं आता कठीण असल्याची प्रतिक्रिया राजाभाऊ रोचकरी यांनी दिली आहे.
