हिंगोली : जिल्ह्यात शेतकऱ्यांना खरीप पीक वाटपासाठी ८७५.९० कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र, आतापर्यंत ४९३.८७ कोटी रुपये पीक कर्जाची वाटप झाले. पीक कर्ज वाटपाची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत आहे. पीककर्ज वाटपाची टक्केवारी ४८.५१ इतकी आहे. पीककर्ज वाटपात ग्रामीण बँकआघाडीवर असली तरी व्यापारी बँकांनी मात्र हात आखडता घेतल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यात ९ व १० जूनला अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या केळी, पपईचे नुकसान केले. बाधित शेतकऱ्यांना अद्याप शासनाकडून मदत मिळाली नाही. तोच ऑगस्ट महिन्याअखेर जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने नदी, नाल्याकाठच्या जमिनी पिकासह खरडून वाहून गेल्या. पीक नुकसानीच्या पंचनाम्याचे काम सुरू आहे. या नैसर्गिक आपत्तीने शेतकरी चांगलाच आर्थिक अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांना आधीच पीककर्ज वेळेत न मिळाल्यामुळे कर्जासाठी खासगी सावकाराकडे हात समोर करावे लागले होते. आता रब्बी पेरणी तोंडावर आली आहे. शेतकऱ्यांना पेरणीकरिता लागणारे बियाणे खरेदीसाठी वेळेत पीक कर्ज उपलब्ध होणे अपेक्षित असते. परंतु, जिल्ह्यात दरवर्षीच पीककर्ज वाटपाचे नियोजन फसते अन् याचा फटका शेतकऱ्यांना बसतो. गतवर्षी खरीप हंगामाच्या शेवटपर्यंत पीककर्ज वाटपाचा आकडा ५५.३८ टक्क्यांवरच होता. किमान यावर्षीचा हंगामात तरी पीक कर्जवाटपासाठी चकरा मारण्याची वेळ येणार नाही, अशी अपेक्षा होती. मात्र, सप्टेंबर उजाडला तरी केवळ ४८.५१ टक्केच पीक कर्जवाटप झाले. विशेष म्हणजे, जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानंतरही बँकांनी पीक कर्ज वाटपात हात आखडता घेतल्याचे चित्र आहे. ३० सप्टेंबरअखेरपर्यंत खरीप पीक कर्ज वाटपाची मुदत आहे. मात्र, बँकांनी पाच महिन्यांत उद्दिष्टाच्या ५० टक्केही कर्ज वाटप केले नसल्याचे समोर आले आहे.
खरीप हंगाम २०२५-२६ साठी बँकांनी शेतकऱ्यांना ४२४ कोटी ८७ लाख रुपयांचे पीककर्ज वाटप केले आहे. पीककर्ज वाटपाची टक्केवारी लक्षात घेता व्यापारी बँकांनी केवळ २५.९० टक्के पीककर्ज वाटप केले आहे. उर्वरित जवळपास ७४ टक्के पीक कर्ज व्यापारी बँका केव्हा वाटप करणार ? असा प्रश्न शेतकऱ्यांतून उपस्थित केला जात आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपात ग्रामीण बँक शाखा आघाडीवर आहे. या बँकेने ९०.१७ टक्के अर्थात १६५ कोटी रुपये पीककर्ज वाटप केले आहे. तर व्यापारी बँकांनी मात्र हात आखडता घेतला आहे. या बँकांनी केवळ २५.९० टक्के शेतकऱ्यांना पीककर्ज दिले. तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून ७५.१६ टक्के पीककर्ज वाटप झाले आहे.