भाजपा नेते सदाभाऊ खोत यांच्यावर सोलापूरमधील एका हॉटेल मालकाने २०१४ पासून बिल थकवल्याचा आरोप केला. तसेच सांगोला दौऱ्यावर असणाऱ्या सदाभाऊ खोत यांचा ताफा अडवत याबाबत जाब विचारला. याबाबत सदाभाऊ खोत यांनी पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिलंय. तसेच या सर्व आरोपांमागे राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते असल्याचा दावा केला. तसेच याबाबत पोलीस तक्रार केल्याचंही नमूद केलं. ते सोलापूरमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सदाभाऊ खोत म्हणाले, “२०१४ च्या निवडणुकीत माझा प्रचार करणारे कार्यकर्ते, पक्षाचे लोक घरातील भाकरी बांधून प्रचार करत होते. माझा एकही कार्यकर्ता त्या काळात हॉटेलमध्ये चहा देखील घेत नव्हता. कारण आमच्याकडे पैसेही नव्हते. २०१४ नंतर मी २०-२५ वेळा सांगोल्याचा दौरा केला. ही व्यक्ती कधीही मला येऊन भेटली नाही आणि काही सांगितलं नाही. कोण जेवलं, कुणी पाठवलं, त्याबाबत काही माहिती आहे का तेही मला आढळून आलं नाही.”

“आरोप करणारा वाळू माफिया, दारू विक्रेता”

“हा सर्व प्रकार झाला तेव्हा सर्व मीडिया तेथे सुसज्ज होता. त्यामुळे मी याचा शोध घेतला तर अशोक शिंगारे हा मोठा गुन्हेगार आहे असं कळालं. २०२० मध्ये कर्नाटकमधून सोने चोरीचा गुन्हा या व्यक्तीविरोधात दाखल आहे. या व्यक्तिविरोधात सात गुन्हे दाखल आहेत. तो वाळू माफिया आहे, तो दारू विक्रेता आहे. यानंतर आम्ही याचा सूत्रधार कोण आहे याचाही शोध घेतला. त्या व्यक्तीच्या फोनवर कुणाचे फोन आले, त्याला अटक केल्यावर पोलिसांना कुणी फोन केले त्याचे रेकॉर्ड काढणं अत्यंत गरजेचं आहे,” असं सदाभाऊ खोत यांनी सांगितलं.

“यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचा एक मोठा नेता”

सदाभाऊ खोत पुढे म्हणाले, “यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचा एक मोठा नेता आहे. त्या नेत्यानेच या व्यक्तीला तू फक्त असं बोलत राहा आणि आम्ही त्याचं शुटिंग करून पसरवतो म्हणून सांगितलं. मात्र, टोमॅटोसारखे गाल असलेल्या राष्ट्रवादीच्या या टोमॅटोला सांगतो की असं षडयंत्र रचून सदाभाऊचा आवाज दाबता येणार नाही. याचा शोध मला लागला, पण पोलिसांना का लागला नाही?”

“पोलिसांवर कुणाचा दबाव होता याचा शोध घ्यावा लागेल”

“मी सरकारी समितीच्या दौऱ्यावर असताना हा प्रकार घडला. त्यामुळे कलम ३५३ अंतर्गत गुन्हा दाखल करायला हवा होता. मात्र, रात्री ९ वाजेपर्यंत आनंद कुलकर्णी गुन्हा दाखल करायला तयार नव्हते. ते कशाला गुन्हा दाखल करायचा म्हणत होते. त्यांच्यावर कुणाचा दबाव होता याचा शोध घ्यावा लागेल,” असं खोत यांनी म्हटलं.

हेही वाचा : सदाभाऊ खोत यांचा अर्ज मागे घेत फडणवीस यांची नियोजनबद्ध खेळी

“राष्ट्रवादीकडून सातत्याने मला धमकावण्याचा, माझ्यावर हल्ला करण्याचा सातत्याने प्रयत्न होत आहे. याची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी मी राज्याच्या गृहमंत्र्यांकडे, मुख्यमंत्र्यांकडे, विरोधी पक्षनेते यांच्याकडे मागणी करणार आहे. राष्ट्रवादी गुन्हेगारांना सांगून मला जीवनातून उठवण्याचा प्रयत्न करत असाल तर ते होणार नाही. रयत क्रांती संघटना याचा मुकाबला करेल,” असंही सदाभाऊ खोत यांनी नमूद केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sadabhau khot answer allegations of hotel bill pending in solapur pbs
First published on: 17-06-2022 at 12:33 IST