सदाभाऊ खोत यांचा सवाल

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

माझ्या मंत्रिपदासाठी राष्ट्रवादीचे नेते आ. जयंत पाटील हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दूरध्वनी करीत असतील तर तेच भाजपचे सरकार चालवितात काय, असा सवाल करीत पक्षाच्या वरिष्ठांनी याची दखल घ्यावी, अशी खोचक प्रतिक्रिया कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी बुधवारी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केली. निवडणुकीपूर्वी दिलेल्या शब्दानुसार मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळत मला मंत्रिपद दिले असल्याचेही त्यांनी सांगितले.

‘राज्यमंत्री खोत मंत्रिपदासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे आपण शब्द टाकावा म्हणून दूरध्वनी करीत होते,’ असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे नेते आ. पाटील यांनी वाळव्यात नुकताच केला. या पाश्र्वभूमीवर राज्यमंत्री खोत ‘लोकसत्ता’शी बोलत होते. ते म्हणाले की, जयंत पाटील यांचे विधान म्हणजे हे सरकार तेच चालवत आहेत, अशा थाटातील आहे. हे असले आरोप करत राज्यकर्त्यांच्या आपण किती जवळचे आहोत असा भास निर्माण करण्याचा प्रयत्न असतो. निवडणुकीपूर्वी भाजपाने विविध पक्षांशी, संघटनांशी आघाडी केली होती. या वेळी सत्तेत वाटा देण्याचा शब्द भाजपाने दिला होता. यानुसार रिपाइंचे रामदास आठवले यांना केंद्रीय मंत्रिपद, रासपचे महादेव जानकर यांना राज्यात मंत्रिपद, विनायक मेटे यांना शिवस्मारक समितीचे अध्यक्षपद देण्यात आले आहे.

आ. पाटील यांचा त्यांच्या इस्लामपूर या घरच्या मैदानावर पराभव केला आहे. यामुळे ते विरोधकांमध्ये बेदिली माजावी यासाठीच अशी वक्तव्य करीत असावेत, असेही ते म्हणाले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा. राजू शेट्टी आणि आपल्यामध्ये कसलाही बेबनाव नसल्याचा खुलासा करीत ते म्हणाले, गेली २५ वष्रे आम्ही चळवळीच्या माध्यमातून एकत्र असून आमची संघटनाही शेतकरी विकासासाठी वैचारिक पातळीवर तयार झालेली असल्याने आमच्यात दुजाभाव येण्याचा प्रश्नच नाही.

सत्तेत गेल्यावर शेतकऱ्याच्या त्रासाचा विसर पडल्याच्या आरोपाबाबत राज्यमंत्री खोत म्हणाले की, गेली १५ वष्रे ही मंडळी सत्तेत होती. शेतकरी आणि शेती व्यवसायाला पायाभूत सुविधा, शेतीमालाला बाजारपेठेची उपलब्धता करून देण्यात यांनी काहीही केले नाही. आम्ही कार्यभार स्वीकारून केवळ चार महिन्यांचा अवधी झाला. एवढय़ा अल्प कालावधीत आज गावाकडला शेतकरी आपला माल थेट मुंबईच्या घरापर्यंत पोहचवू लागला. सावता माळी बाजारपेठेची कल्पना प्रत्यक्षात आणली. शेतीमालाच्या व्यापारातील दलाली बंद करण्याचा निर्णय घेण्याबरोबरच शेतकऱ्याच्या हाती चार जादा पसे मिळावेत ही शासनाची भूमिका आहे, असेही खोत यांनी सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sadabhau khot comment on jayant patil
First published on: 05-01-2017 at 01:36 IST