रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांच्याकडून सातत्याने वादग्रस्त विधाने केली जात आहेत. काही दिवसांपूर्वीच सोलापूरमधील एका सभेत बोलताना त्यांनी ईडीची गती वाढवा, गडी एकतर आपल्यात आला पाहीजे. नाहीतर घाबरून मेला पाहीजे, असं विधान केले होते. त्यानंतर बुधवारी त्यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. विरोधात असणारे सगळेच भ्रष्टाचारी असून एका एकाला तुरुंगात घाला, असे ते म्हणाले. इचलकंरजीतील एका सभेत बोलताना त्यांनी हे विधान केले. त्यांच्या या वादग्रस्त विधानांनंतर आता विरोधकांकडून सत्तधाऱ्यांना लक्ष्य करण्यात येत आहे.

नेमकं काय म्हणाले सदाभाऊ खोत?

“जे जे गडी विरोधात आहे, ते सगळे भ्रष्टाचारी आहेत. एका एका गड्याला आत घालायला सुरूवात करा, सगळे गडी रांगत रांगत चालायला लागतील. पण सरकार फक्त भीती दाखवते आणि सोडून देते, असं करू नका”, असं विधान सदाभाऊ खोत यांनी केलं.

हेही वाचा – देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल; म्हणाले, “मी काँग्रेसचा मतदार हे उद्धव ठाकरे म्हणाल्याचं ऐकून बाळासाहेबांच्या आत्म्याला..”

“विरोधात आहे ते सगळे भ्रष्टाचारी आहेत. सरकारने यांच्या फाईली वर काढाव्या. हे गडी हुशार आहेत, चांगले कपडे आणि जॅकेट घालून जनतेपुढे येतात. गोड गोड बोलतात, जनतेला वाटतं की कोणी मोठा गडी आला, पण तो मोठा गडी नसतो, अशा गड्यांना मातीत घाला, तरच महाराष्ट्र सन्मानाने उभा राहू शकतो”, असेही ते म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोलापूरच्या सभेतही केलं होतं वादग्रस्त विधान

दरम्यान, सोलापूरच्या सभेत बोलतानाही सदाभाऊ खोत यांनी वादग्रस्त विधान केले होते. “कुणी काहीही म्हणू द्या, पण देवेंद्र फडणवीस यांना मानतो. लोक म्हणतात काही झालं तरी ईडी मागे लावतात. पण मी म्हणतो ईडीची गती वाढवा. गडी एकतर आपल्यात आला पाहीजे. नाहीतर घाबरून मेला पाहीजे.” असे ते म्हणाले होते.