राज्य सरकारने द्राक्षे बागायतदार तसेच वाइन उद्योगास चालना मिळावी, यासाठी मोठी किराणा दुकाने अथवा सुपरमार्केट तसेच ‘वॉक इन स्टोअर’मध्ये वाइनविक्रीस परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्रिमंडळाने त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. हा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर त्यावरून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा वाद सुरू झाला आहे. भाजपानं या मुद्द्यावरून राज्य सरकारला लक्ष्य केलंय. तर आता या निर्णयावर शेतकरी नेते आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनीही टीका केली आहे. आता मंदिरात पाण्याऐवजी वाईन द्या, असं म्हणत त्यांनी आघाडी सरकारवर निशाणा साधला.
“राज्यातील महाविकास आघाडी ही मद्यविक्री विकास आघाडी आहे. शेतकऱ्यांच्या नावावर दुकानदारी खपवण्यासाठी वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला गेला. आता गावातल्या दुधाच्या डेअरी बंद करा आणि वायनरी काढा,” अशी टीका सदाभाऊ खोत यांनी टीव्ही ९ मराठीशी बोलताना केली. पुढे ते म्हणाले की, “राज्य सरकारने साखर कारखान्यांमधील अंतराची अट काढून टाकावी, मग आम्ही समजेल की तुम्ही शेतकऱ्यांसाठी त्यांच्या हिताचा निर्णय घेत आहात. एसटी मधला कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार संपायला तयार नाही. कामगारांच्या मनात धास्ती आहे, लालपरी वाचणार नाही,” अशी भीतीही त्यांनी बोलून दाखवली.
दरम्यान, राज्य सरकारने सुपरमार्केटमध्ये वाइनविक्रीस परवानगी देण्याचा निर्णय घेतल्यानंतर विरोधी पक्षांकडून सातत्याने टीका सुरूच आहे. तर, यासंर्भात बोलताना वाईन आणि दारूत फरक असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते. त्यावरून देखील त्यांच्यावर टीका झाली. “वाइन आणि दारू यात जमीन-आस्मानाचा फरक आहे. आपल्या राज्यातले अनेक शेतकरी वेगवेगळ्या प्रकारची फळं तयार करतात. द्राक्ष, काजूपासून वाइन तयार होते. अशी अनेक फळं आहेत. आपल्याकडे वाइन पिणाऱ्यांचं प्रमाण अतिशय अल्प आहे. जेवढी वाइन तयार होते, तेवढी आपल्या राज्यात खपत नाही. इतर राज्यांत आणि काही परदेशात निर्यात होते,” असं अजित पवार यांनी वाइनच्या व्यवसायासंदर्भात माहिती देताना सांगितलं होतं.