Sadabhau Khot Vidhan Parishad Election: नुकत्याच पार पडलेल्या राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारला मोठा फटका बसला आहे. यामुळे आगामी विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर सर्व पक्ष सावध झाले आहेत. २० जून रोजी विधान परिषदेची निवडणूक पार पडणार आहे. ही निवडणूक गुप्त पद्धतीने होणार असल्याने मोठा दगाफटका होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. विधान परिषदेचा अर्ज मागे घेण्याची आज शेवटची तारीख होती. शेवटच्या पंधरा मिनिटांपर्यंत कोणत्याही पक्षाकडून अर्ज मागे घेण्यात आला नव्हता.

पण अखेरच्या क्षणी भारतीय जनता पार्टी पुरस्कृत अपक्ष उमेदवार सदाभाऊ खोत यांनी आपला अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे आता भाजपाकडून पाच उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरवले जातील, हे स्पष्ट झालं आहे. सदाभाऊ खोत यांनी भाजपा पुरस्कृत अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला होता.

दुसरीकडे काँग्रेस आपला एक उमेदवार मागे घेतील अशी चर्चा होती, मात्र काँग्रेसने आपला उमेदवार मागे घेतलेला नाही. त्यामुळे आता जागांवर ११ उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे राज्यसभेप्रमाणे विधान परिषदेची निवडणूक देखील चुरशीची होण्याची शक्यता आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काही वेळापूर्वी सदाभाऊ खोत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं की, भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस जे काही निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल. शेवटच्या दोन तासांपर्यंत अर्ज मागे घेण्याबाबत कोणताही निर्णय झाला नव्हता. पण अखेरच्या क्षणी सदाभाऊ खोत यांनी विधान परिषदेसाठी उमेदवार म्हणून दाखल केलेला अर्ज मागे घेतला आहे.