Sakhar Chauth Ganeshotsav 2025 Raigad – डिजेंचा दणदणाट आणि लेझर लाईटच्या झगमगाटात अलिबाग येथे साखरचौथीच्या गणेशांचे विसर्जन करण्यात आले. जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी काढलेल्या डिजे आणि लेझरलाईट बंदीचे यावेळी सर्रास उल्लघन झाल्याचे पहायला मिळाले, कानठळ्या पसवणाऱ्या डिजेंच्या आवाजाने विर्सर्जन मिरवणूकीचा मार्ग दणाणून गेला होता. कर्णकर्कष्य आवाजावर तरूणाई बेभान होऊन थिरकत होती.
रायगड जिल्ह्यात कष्टकऱ्यांचा सोहळा मानल्या जाणाऱ्या साखरचौथ गणेशोत्सवाचा उत्साहात समारोप झाला. बुधवारी जिल्ह्यातील पेण, पनवेल, उरण, अलिबाग, कर्जत, खालापूर आदी भागात तब्बल ९२८ गणरायांचे वाजत-गाजत आगमन झाले होते. दोन दिवस भक्तिभावाने पूजा-अर्चा व विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडल्यानंतर गुरुवारी (ता. ११) डिजेच्या दणदणाटात, लेझर लाईट्सच्या झगमगाटात आणि फटाक्यांच्या आतषबाजी मध्ये विसर्जन मिरवणुका निघाल्या.
कायम उत्साहात विसर्जन मिरवणुका अलिबाग, पेण, पनवेलसह जिल्ह्यातील तालुक्यांत सायंकाळपासूनच मिरवणुकींना सुरुवात झाली. पारंपरिक ढोल-ताशा पथकांचा गजर, तरुणाईची नृत्याविष्कारावरची थिरकणारी पावले, लेझर शो व रंगीबेरंगी सजावट यामुळे संपूर्ण परिसर उत्सवी वातावरणाने दुमदुमून गेला होता. पण पारंपारिक वाद्यांच्या साथीने गणेश विसर्जन होणे अपेक्षित असतांना अलिबाग मध्ये अनेक सार्वजनिक गणेशमंडळांनी तसेच खाजगी व्यक्तींनी विसर्जनासाठी डिजेच्या आणि लाईट्सच्या भल्या मोठ्या भिंतीचा वापर केल्याचे पहायला मिळाले.
गणेशोत्सवापूर्वीच जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी उत्सव काळात डिजे आणि लेझरलाईट्सच्या वापरावर निर्बंध घातले होते. याबाबतचे आदेश जारी करण्यात आले होते. मात्र साखरचौथीच्या गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीदरम्यान या आदेशाचे अनेकांनी उलघन केल्याचे दिसून आले.
महत्वाची बाब म्हणजे गणेश विसर्जन मिरवणूकांच्या पार्श्वभूमीवर यगड जिल्हा पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने मोठा बंदोबस्त ठेवला होता. ६९ पोलिस अधिकारी, ४५३ पोलिस अंमलदार, ५८ वाहतूक अंमलदार,११ स्ट्रायकींग फोर्स या शिवाय क्यूआरटी व आरसीपी पथकयांची नेमणूक करण्यात आली होती. वाहतुकीसाठी पर्यायी मार्गांची व्यवस्था करण्यात आली होती.
विसर्जन स्थळांवर गर्दी
अलिबाग, उरण, पनवेलसह खालापूर, कर्जत, पेण परिसरातील तलाव व समुद्रकिनाऱ्यावर विसर्जनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. वातावरणात भक्ती आणि उत्साहाचे मिश्र स्वर गुंजत होते. अलिबाग शहरात अलिबाग समुद्र किनाऱ्यापासून ते महावीर चौका पर्यंत गणेश विसर्जनासाठी मोठी गर्दी उसळली होती.