Sambhaji Brigade Praveen Gaikwad Press Conference : संभाजी ब्रिगेडचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर रविवारी (१३ जुलै) सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे भ्याड हल्ला करण्यात आला. दीपक काटे याच्यासह शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी गायकवाड यांच्या तोंडाला काळं फासलं. त्यांच्या डोक्यावर, अंगावर काळी शाई टाकून त्यांना धक्काबुक्की करण्यात आली आहे. या घटनेनंतर सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, प्रवीण गायकवाड यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेऊन त्या दिवशी नेमकं काय घडलं याची सविस्तर माहिती दिली आहे.
प्रवीण गायकवाड म्हणाले, “अक्कोलकोट येधे जन्मेजयराजे भोसले यांचा सत्कार समारंभ होता. त्यांचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याशी नातं आहे. त्यांच अक्कलकोटमध्ये मोठं समाजकार्य आहे. ते अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ अन्नछत्र देखील चालवतात. त्यांची इच्छा होती की त्यांच्या सामाजिक कार्याचा सत्कार व्हावा. त्यांचा नागरी सत्कार केला जाणार होता. सकल मराठा समाजाच्या लोकांनी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष म्हणून माझं नाव घेऊन जन्मेजय महाराजांना विनंती केली. त्यांचं वय व सामाजिक काम पाहता, तसेच इतक्या मोठ्या राजाचा सत्कार माझ्या हस्ते होतोय हे पाहून मलाही आनंद झाला.”
काय म्हणाले प्रवीण गायकवाड?
संभाजी ब्रिगेडचे माजी प्रदेशाध्यक्ष म्हणाले, अक्कलकोटला जात असल्यामुळे माझं कुटुंब देखील माझ्याबरोबर होतं. कारमध्ये माझी पत्नी होती. तिथे जाईपर्यंत मला अशा काही हल्ल्याची पूर्वकल्पना नव्हती. अचानक काही लोक आले आणि त्यांनी विषारी वंगण, तेल माझ्या अंगावर टाकलं. ते तेल परिक्षणासाठी नेण्यात आलं आहे. आमच्या कार्यकर्त्यांनी सुरक्षिततेसाठी मला कारमध्ये नेलं. हल्ला करण्यासाठी दीपक काटे हा गुन्हेगार सर्वात पुढे होता. परंतु, ज्या कार्यक्रमासाठी मी गेलो होतो तिथे कोणीही या घटनेचा साधा निषेध नोंदवला नाही, आयोजकांनी पोलिसांत तक्रार देखील केली नाही. मी चार-पाच तास तिथे होतो, कोणी त्या घटनेचा उल्लेखही केला नाही.
प्रवीण गायकवाड म्हणाले, माझ्यावर हल्ला होत असताना भाजपाच्या लोकांनी हल्ल्याचा व्हिडीओ चित्रित केला आणि सर्वत्र व्हायरल केला. आता आम्ही याचा काय अर्थ घ्यायचा?
प्रवीण गायकवाडांनी सांगितली दीपक काटेची गुन्हेगारी पार्श्वभूमी
दीपक काटे याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असताना भाजपाने त्याला पक्षात अनेक मोठमोठी पदं दिली आहेत. स्वतःच्या भावाच्या खून प्रकरणात त्याने शिक्षा भोगली आहे. खंडणीपासून विविध प्रकारच्या गंभीर गुन्ह्यांची त्याच्या नावावर नोंद आहे. तरी भाजपाने त्याला युवा मोर्चाचं सरचिटणीसपद दिलं आहे. तो अनेकदा भाजपा नेते तथा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबरोबर दिसला आहे. त्याच्याकडे अवैध शस्त्रे देखील सापडली आहेत. अशा गुन्हेगाराला भाजपा पाठिशी घालत आहे.