मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केलं आहे. दुसऱ्या टप्प्यातील उपोषणाचा आज ( २९ ऑक्टोबर ) पाचवा दिवस आहे. पाचव्या दिवशी जरांगे-पाटलांची प्रकृती खालावली आहे. जरांगे पाटलांनी अन्न आणि पाण्याचा त्याग केल्यानं निटसे बोलताही येत नाही.
जरांगे-पाटलांनी पहिल्याच दिवसांपासून उपचारास नकार दिला आहे. रविवारीही आरोग्य विभागाचं पथक उपचारासाठी
उपोषणस्थळी दाखल झालं होतं. पण, तपासणी करण्यास जरांगे-पाटलांनी नकार दिला आहे. दरम्यान, स्वराज्य संघटनेचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती यांनी जरांगे-पाटलांशी फोनवरून चर्चा केली आहे. तसेच, पाणी पिण्याचं आवाहन संभाजीराजेंनी जरांगे-पाटलांना केलं आहे.
संभाजीराजे म्हणाले, “माझ्या शब्दाला मान ठेवून तुम्ही पाणी प्यायला होता. मी परत सारखं सांगणं चुकीचं आहे. तुमची प्रकृती ठीक असणं समाजासाठी गरजेचं आहे. तुम्ही पाणी पिलं पाहिजे. समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी तुमची प्रकृती ठीक असायला हवी. शेवटी निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे.”
“लढ्याला न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही व्यवस्थित असं महत्वाचं आहे. काळजी घ्या.. आणि प्लीज पाणी प्या,” अशी विनंती संभाजीराजेंनी मनोज जरांगे-पाटलांना केली आहे.