scorecardresearch

Rajya Sabha Election: शिवरायांसमोर नतमस्तक होणाऱ्या फोटोसहीत संभाजीराजेंची पोस्ट; म्हणाले, “महाराज, तुमच्या…”

संभाजीराजे हे अपक्ष म्हणून लढण्यावर ठाम असल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली आहे. 

Chhatrapati Sambhajiraje latest FB post
Chhatrapati Sambhajiraje FB post : संभाजीराजेंची पोस्ट चर्चेत (फोटो फेसबुकवरुन साभार)

राज्यसभेसाठी शिवसेनेतर्फे संजय राऊत आणि कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार हे दोन्ही उमेदवार आज अर्ज दाखल करणार असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार या वेळी उपस्थित राहणार आहेत. कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांनी शिवसेनेत प्रवेश करण्यास नकार दिल्याने त्यांच्या उमेदवारीचा विषय मागे पडला. राज्यसभेच्या सहा जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीत संभाजीराजे हे अपक्ष म्हणून लढण्यावर ठाम असल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली आहे. संभाजीराजे हे निवडणूक लढविण्याच्या निर्णयावर ठाम राहिल्यास १० जूनला प्रत्यक्ष मतदान होईल. याच पार्श्वभूमीवर राज्यामध्ये राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असतानाच संभाजीराजेंनी फेसबुकवर छत्रपती शिवाजी महारांना वाकून नमस्कार करताना स्वत:चा एक फोटो भावनिक मजकुरासहीत पोस्ट केलाय.

नक्की वाचा >> “संजय राऊत तुमचा हा सत्तेचा माज महाराष्ट्रातील….”; संभाजीराजेंना उमेदवारी नाकारल्याने मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

नेमका गोंधळ काय?
राज्यसभेच्या दुसऱ्या जागेकरिता शिवसेनेने कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांना उमेदवारी देण्याची तयारी दर्शविली होती. फक्त त्यांनी शिवसेनेत प्रवेश करावा व पक्षाचे अधिकृत उमदेवार म्हणून रिंगणात उतरावे ही अट संभाजीराजे यांना घालण्यात आली आहे. अपक्ष म्हणून महाविकास आघाडीने पाठिंबा द्यावा, अशी संभाजीराजे यांची भूमिका आहे. या साऱ्या घडामोडी घडत असतानाच शिवसेनेने संभाजीराजे यांना सूचक इशारा दिलेला. कोल्हापूर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांना राज्यसभेची दुसरी उमेदवारी देण्याची तयारी शिवसेनेने दोन दिवसांपूर्वीच सुरू केली. संभाजीराजे हे कोल्हापूरचे आहेत. यामुळेच कोल्हापूरच्या दुसऱ्या नेत्याला उमेदवारी देण्याची रणनीती शिवसेनेने आखली. मराठा समाजातील सामान्य शिवसैनिकाला राज्यसभेची संधी दिल्याचा संदेश संजय पवार यांच्या उमेदवारीतून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

शिवसेनेनं फसवल्याचा आरोप आणि सेनेनं दिलेलं उत्तर
शिवसेनेने छत्रपती संभाजीराजे यांना राज्यसभेच्या उमेदवारीवरून फसवल्याचा आरोप त्यांच्या समर्थकांनी केला  असला तरी शिवसेना नेते संजय राऊत यांनी तो फेटाळून लावला. शिवसेना संभाजीराजे यांना पक्षाची अधिकृत उमेदवारी आणि  ४२ मते  देण्यास तयार होती; पण संभाजीराजे यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश करण्यास नकार दिला. संभाजीराजे यांनी राष्ट्रवादीतर्फे २००९ मध्ये लोकसभा निवडणूक लढवली होती. भाजपकडून २०१६ मध्ये खासदारकी घेतली. मग त्यांना पक्षप्रवेशाचे वावडे असण्याचे काही कारण नव्हते, असे राऊत यांनी स्पष्ट केले.

नक्की वाचा >> “पुण्य आपल्या पदरात पाडून घ्या,” संभाजीराजेंसाठी मनसेचं ट्वीट; म्हणाले “मराठा समाजाने कावेबाजांचा…”

संभाजीराजे काय म्हणाले?
शिवसेनेनं घातलेली अट आणि राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजेंनी फेसबुकवरुन एक पोस्ट केलीय. यामध्ये ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णकृती पुतळ्यासमोर नतमस्तक होताना दिसत आहेत. “महाराज… तुमच्या नजरेतलं स्वराज्य मला घडवायचंय… मी कटीबद्ध असेन तो तुमच्या विचारांशी… मी बांधील असेन तो फक्त जनतेशी…”, असं या पोस्टच्या कॅप्शनमध्ये संभाजीराजेंनी म्हटलंय.

मतदानाची टक्केवारी कशी?
राज्यसभेत विजयासाठी पहिल्या पसंतीच्या ४१.०१ मतांची आवश्यकता आहे. शिवसेनेचे ५५ आमदार असून, राष्ट्रवादी व काँग्रेसकडील अतिरिक्त मते तसेच अपक्ष आणि छोटय़ा पक्षांच्या मतांच्या आधारे दुसरी जागा जिंकण्याची शिवसेनेची योजना आहे. भाजपाकडे २२ अतिरिक्त मते असून, काही अपक्षांची भाजपाला साथ आहे. ही मते संभाजीराजे यांना दिली जाऊ शकतात. अपक्ष व छोटय़ा पक्षांचा पाठिंबा मिळविण्यात संभाजीराजे किंवा भाजपाला यश आले तरच भाजपाला ४१.०१ मतांचा टप्पा गाठता येऊ शकतो. सध्या तरी ही शक्यता कमी दिसते.

संभाजीराजे यांचा भाजपा वापर करून घेईल अशी चिन्हं
महाविकास आघाडीने संभाजीराजे यांचा पराभव केला, असा बाहेर प्रचार करून मराठा समाजात  महाविकास आघाडीच्या विरोधात वातावरणनिर्मिती करण्यावर भाजपाचा भर असेल. यातूनच संभाजीराजे यांचा भाजपा वापर करून घेईल, अशी चिन्हे आहेत. 

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sambhajiraje chhatrapati emotional fb post ahead of rajya sabha election nomination scsg

ताज्या बातम्या