Sambhaji Raje Chhatrapati On Waghya Statue Controversy : गेल्या काही दिवसांपासून रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून वाद सुरु आहे. यावरून संभाजीराजे छत्रपती यांनी वाघ्या कुत्र्याची समाधी रायगडावरून हटवण्याची मागणी केलेली आहे. तसेच या संदर्भातील एक पत्र काही दिवसांपूर्वी त्यांनी राज्य सरकारला दिलं होतं. दरम्यान, यावर अनेकांनी आपआपलं मत देखील मांडलं. आता संभाजीराजे छत्रपती हे पुन्हा एकदा या मुद्यावरून आक्रमक झाले आहेत. तसेच कायदेशीर मार्गाने किल्ले रायगडवरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याची मागणी करत लवकरात लवकर सरकारने याबाबतचा निर्णय घेण्याची मागणी त्यांनी आज माध्यमांशी बोलताना केली आहे.
संभाजीराजे छत्रपती काय म्हणाले?
“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आम्ही सांगितलं आहे आणि त्या संदर्भात जनजागृती देखील केली आहे. वाघ्या कुत्र्याचा आणि किल्ले रायगडचा काही संबंध नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीच्या बाजूला तेवढीच उंच समाधी उभा करणं ही दुर्देवाची बाब आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीसाठी तुकोजी होळकर महाराजांनी मदत केली, त्यामुळे त्यांचं नाव त्या ठिकाणी सोनेरी अक्षरात कोरलं गेलं पाहिजे. तुकोजी होळकर यांनी वाघ्या कुत्र्याच्या समाधीसाठी मदत केलेली नसून दंतकथेच्या माध्यमातून वाघ्या कुत्र्याची समाधी उभी राहिलेली आहे”, असं संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं आहे.
“छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीसाठी जी मदत केली, त्याबाबतचा उल्लेख त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे. त्यासाठी रायगड प्राधिकरणाचा अध्यक्ष म्हणून मी ती जबाबदारी घेणार आहे. हा सर्व विषय आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितलेला आहे. त्यांना देखील हा विषय पटलेला आहे. लवकरात लवकर ते याबाबत समिती स्थापन करणार आहेत. समिती स्थापन झाल्यानंतर डाव्या, उजव्या आणि सर्व आघाडीच्या लोकांना त्या समितीत घेण्याची विनंती आम्ही केलेली आहे”, असं संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं आहे.
तसेच वाघ्या कुत्र्याच्या समाधीबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी विनंती आम्ही सरकारला केलेली आहे. तसेच कुठलाही कायदा हातात घेण्याचा विषय नाही. आम्ही हा विषय मांडल्यानंतर ठरावीक एक दोघे जण वाघ्या कुत्र्याच्या समाधीबाबत बोलायला लागले आहेत. मी देखील हेच सांगत आहे की वाघ्या कुत्र्याच्या संबंध नाही. तुकोजी होळकर महाराजांचा संबंध खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीशी आहे. त्यामुळे माझं म्हणणं आहे की त्यांचं नाव सोनेरी अक्षरात कोरलं गेलं पाहिजे”, असंही संभाजीराजे छत्रपती म्हणाले आहेत.
“छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसाठी योगदान दिलेले काही मोजके लोक आहेत. राजर्षी शाहू महाराज यांनी देखील तेव्हा रायगडच्या जीर्णोद्धारासाठी पैसे दिले होते. त्याप्रमाणे होळकर महाराजांनी देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसाठी मदत केली होती. आता वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याच्या विरोधात जे कोणी असतील, त्यांना समोर बोलवा, मी त्यांच्यासमोर पुरावे ठेवतो. कारण एकही इतिहासकार सांगत नाही की वाघ्या कुत्र्याचा इतिहासात संदर्भ आहे”, असं संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं आहे.