माजी खासदार संभाजीराजे यांनी आज उस्मानाबाद दौऱ्यावर असताना एका आरोग्य केंद्राची पाहणी केली. यावेळी या केंद्राची दुरावस्था बघून संभाजीराजे चांगलेच संतापले. राज्याच्या आरोग्यमंत्र्यांच्याच मतदारसंघातील आरोग्य केंद्राची वाईट अवस्था बघून त्यांनी शिंदे सरकारवर जोरदार टीकास्र सोडलं.
हेही वाचा – सर्वोच्च न्यायालयात घमासान, एकनाथ शिंदेंच्या ‘त्या’ पत्राचा संदर्भ देत ठाकरे गटाकडून शिंदे गटाची कोंडी
काय म्हणाले संभाजीराजे?
राज्यातील आरोग्यकेंद्रे जर सुसज्य होणार नसतील, तर आम्ही वेळोवेळी आंदोलनं करू. याच उद्देशाने आम्ही स्वराज्य संघटनेची स्थापना केली आहे. माझी राज्य सरकारला इशारा देतो, की त्यांनी लवकरात लवकर या आरोग्य केंद्रांची सुधारणा करावी. आरोग्य केंद्र हे सामान्य माणसाच्या हक्काचं आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया संभाजीराजेंनी दिली. सर्वच राजकीय नेते शिवाजी महाराजांचा नाव घेऊन राजकारण करतात. मग त्यांचे विचार आचरणात का आणत नाही? शिवाजी महाराजांच्या राज्यात अशी वाईट अवस्था राहिली असती का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
संभाजीराजेंकडून आरोग्य केंद्राची पाहणी
आज या आरोग्य केंद्रात कर्मचाऱ्यांची कमी आहे. येथील कॉप्युटर धूळ खात पडले आहेत. बाथरूमध्ये साधं पाणीदेखील नाही. आरोग्य केंद्राच्या मागे डॉक्टरांसाठी राहण्याची व्यवस्था आहे. मात्र, तिथे कोणीही राहत नाहीत. त्याठिकाणी डुकरं जमा झाली आहेत, हे सर्व आम्ही कॅमेरात रेकॉर्ड करून ठेवलं आहे, असेही ते म्हणाले.
हेही वाचा – “१०० सोडा, मी शिंदेना पाच फोन जरी केले असतील तर…”; मोहित कंबोज यांच्या आरोपानंतर भास्कर जाधव आक्रमक!
आधी आरोग्य खात्यातील भरती करा
राज्य सरकारने भरतीसंदर्भात मोठा गाजावाजा केला. मात्र, सरकारला भरती करायची असेल तर आधी आरोग्य खात्यातील भरती करावी. याची सर्वात जास्त आवश्यकता आहे. आम्ही आज आरोग्य केंद्राची पाहणी करताना सर्व व्हिडीओ रेकॉर्डींग केली आहे. तसेच मी यासंदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.