scorecardresearch

राज ठाकरेंच्या त्या पोस्टनंतर तासाभरातच राऊतांचं ट्विट; शरद पवारांना टॅग करत म्हणाले, “निकले हैं वो लोग हमारी…”

राज ठाकरेंनी आठ वाजून १३ मिनिटांनी आवाहन करणारं पत्र पोस्ट केल्यानंतर तासाभरात राऊतांची पोस्ट

Raut Raj Pawar
राऊत यांनी अप्रत्यक्षपणे साधला निशाणा (फाइल फोटो)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी मशिदींवरील भोंग्यांविरोधातील आपल्या भूमिकेवर ठाम राहत बुधवारपासून मशिदींमधून भोंग्यांवर अजान ऐकू आल्यास हनुमान चालीसा लावण्याचं आवाहन केलंय. राज यांनी पत्रक जारी करुन हे आवाहन केल्यानंतर काही वेळामध्येच शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी ट्विटरवरुन शेरोशायरीच्या माध्यमातून सूचक प्रतिक्रिया दिलीय. विशेष म्हणजे यामध्ये राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांचं ट्विटर हॅण्डल टॅग केलं आहे.

नक्की वाचा >> “राज ठाकरेंसारख्या लोकांना…”; राज ठाकरेंच्या भोंगाविरोधी आवाहनानंतर मोदींचा उल्लेख करत राष्ट्रवादीचं प्रतिआवाहन

राज नेमकं काय म्हणाले?
जिथे जिथे भोंग्यावरून बांग दिली जाते तिथे तिथे भोंग्यावरून हनुमान चालीसाचे पठण करावे, असे आवाहन करीत मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी भोंग्यांचा त्रास काय होतो हे त्यांनाही समजू दे. देशभरात प्रत्येक राज्यात आपापल्या सत्ताधाऱ्यांना हिंदुची ताकद दाखवून द्या, असं राज यांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटलंय.

…तर आमच्याकडून त्याचे उत्तर धर्मानेच दिले जाईल
मशिदीवरील सर्व भोंगे अनधिकृत आहेत. सरकार अनधिकृत मशिदींवरील भोंग्यांना अधिकृत परवानग्या कशा देते. त्यांना परवानगी देणार असाल तर देवळांनाही परवानगी द्यायलाच हवी. रस्त्यावर नमाजसाठी बसणे, वाहतूक कोंडी करणे कोणत्या धर्मात बसते. भोंग्यांचाही विषय हा प्रश्न धार्मिक नसून सामाजिक आहे. पण या विषयाला धार्मिक वळण देण्याचा प्रयत्न केला तर आमच्याकडून त्याचे उत्तर धर्मानेच दिले जाईल, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे.

नक्की वाचा >> “…आणि महाविकास आघाडी राज ठाकरेंना तुरुंगात डांबेल”; चंद्रकांत पाटलांची पोस्ट चर्चेत

याची हिंदुंनी काळजी घ्यावी
देशातील शांतता बिघडवायची नाही. देशात आम्हाला दंगलीही नकोत. आपण धर्मासाठी हट्टीपणा सोडणार नसाल तर आम्हीही आमचा हट्ट सोडणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. सर्व स्थानिक मंडळांनी आणि सजग नागरिकांनी भोंगे काढण्यासाठी स्वाक्षरी मोहीम राबवावी आणि स्वाक्षऱ्यांची निवेदन पत्रे रोजच्या रोज पोलीस ठाण्यात येऊन द्यावीत. मशिदीत बांग सुरू झाल्यावर पोलिसांच्या १०० क्रमांकावर भोंग्याचा त्रास होत असल्याची तक्रार करावी. ती रोज करावी, असा कार्यक्रमही राज ठाकरे यांनी जाहीर केला. तसेच ज्या मशिदींवरील भोंगे उतरवले आहेत त्याचे स्वागत करत त्या मशिदीच्या परिसरात कोणताही त्रास होणार नाही याची हिंदुंनी काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे.

एवढ्या हिंदुंना डांबू शकत नाही
हा विषय एका दिवसात सुटणार नाही. प्रत्येक राज्यातील हिंदुंनी आपापल्या सत्ताधारी-राज्यकर्त्यांना हिंदुंची ताकद काय आहे हे दाखवून द्यावे. देशाच्या कारागृहात तमाम हिंदुंना डांबणे सरकारला शक्य होणार नाही हे लक्षात घ्यावे, असेही त्यांनी म्हटले आहे.

राज यांचा पवारांना टोला
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कित्येक वर्षांपूर्वी सर्व भोंगे बंद झालेच पाहिजे अशी भूमिका जाहीर केली होती. ते तुम्ही ऐकणार आहात की नाही. की सत्तेवर बसवणाऱ्या बेगडी धर्मनिरपेक्षतावादी शरद पवार यांचे ऐकणार आहात, याचा फैसला महाराष्ट्रातील जनतेसमोर होऊन जाऊ दे, असे आव्हान राज यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले.

नक्की पाहा >> “ज्या दिवशी माझं सरकार महाराष्ट्रात येईल त्यावेळी रस्त्यावरील नमाज…”; राज ठाकरेंनी शेअर केला बाळासाहेबांचा जुना Video

राऊत काय म्हणाले?
राज ठाकरेंनी रात्री आठ वाजून १३ मिनिटांनी ट्विटरवरुन वरील मजकूर असणारं पत्रक जारी केलं. त्यानंतर तासाभरामध्ये म्हणजेच नऊ वाजून १२ मिनिटांनी एक ट्विट केलं. या ट्विटमध्ये त्यांनी शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं अकाऊट टॅग केलं आहे. या ट्विटमध्ये राऊतांनी, “निकले हैं वो लोग हमारी शख्शियत बिगाड़ने जिनके खुद के किरदार मरम्मत मांग रहे हैं,” असं म्हटलं आहे. म्हणजेच ज्यांच्या स्वत:च्या व्यक्तीमत्वाला आणि भूमिकाला डागडुजीची गरज आहे तेच आता आमच्यावर चिखलफेक करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा टोला राऊत यांनी अप्रत्यक्षपणे राज यांना लागवला आहे.

राज ठाकरेंनी जाहीर केलेल्या या भूमिकेनंतर राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने अनेक ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. दरम्यान बुधवार पहाटेपासूनच अनेक ठिकाणी भोंग्यावर नमाज न होता भोंग्याशिवाय नमाज अदा करण्यात आल्याचंही दिसून आलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sanajay raut tweet tagging sharad pawar uddhav thackeray after raj thackeray tweets letter scsg

ताज्या बातम्या