Sandeep Deshpande on Maharashtra Assembly : “महाराष्ट्राच्या विधान भवनात सगळे षंढ बसले आहेत”, अशी टीप्पणी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे. विधीमंडळात आयोजित कार्यक्रमाचा फलक मराठी भाषेत नसल्याचं पाहून देशपांडे यांनी संताप व्यक्त केला आहे. संसदेच्या अंदाज समितीला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त महाराष्ट्राच्या विधान भवनात लोकसभेने एक कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अनेक आमदार उपस्थित होते.

या कार्यक्रमावेळी केवळ हिंदी व इंग्रजी भाषेत फलक लावण्यात आला होता. ते पाहून संदीप देशपांडे यांनी संताप व्यक्त केला. देशपांडे म्हणाले, “हे या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. विधान भवनात सगळे षंढ बसले आहेत. हे पाहून मराठी माणसाने काय करायचं”.

माझा शब्द झोंबला असेल तर विचार करावा : देशपांडे

दरम्यान, संदीप देशपांडे यांच्या या वक्तव्यावर सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांनी टीका केली आहे. त्यांच्यावर हक्कभंगाची कारवाई करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. मात्र, त्याला देशपांडे यांनी जुमानलं नाही. ते म्हणाले, “मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे. कारण मी केवळ त्या वृत्तीला बोललो, कुठल्याही व्यक्तीला बोललो नाही. माझ्यावर हक्कभंग आणला तरी मी त्या कारवाईसाठी तयार आहे. तसेच माझा शब्द कोणाला झोंबला असेल तर त्यांनी विचार करावा. त्यांच्या कृत्याने आम्हालाही वेदना होत आहेत”.

…तर मी तुरुंगात जायला तयार आहे : संदीप देशपांडे

संदीप देशपांडे म्हणाले, “आपली भाषा आपण जगवणार नाही तर कोण जगवणार? बिहारचे लोक? ठीक आहे, मी बोललो ते बोललो. मात्र, मी कुठल्याही व्यक्तीला बोललो नाही. मी त्या वृत्तीला बोललो. कारण ती षंढपणाची वृत्ती आहे. लोकसभेने २२ भाषांना मंजुरी दिली आहे. मग ज्या राज्यात कार्यक्रम आहे. तिथे त्या राज्याची भाषा नको का? कोणाला माझा शब्द झोंबला असेल तर त्यावर त्यांनी विचार करावा. तसेच माझ्यावर हक्कभंग आणत असाल तर मी त्या कारवाईला सामोरा जायला तयार आहे. मराठी भाषेसाठी मी तुरुंगात जायला तयार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उपमुख्यमंत्र्यांकडून सारवासारव

दरम्यान, देशपांडे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “तो लोकसभेने आयोजित केलेला कार्यक्रम होता. आपल्या विधानसभेचा किंवा आपला कार्यक्रम जिथे कुठे असतो तिथे सर्वात आधी मराठी असते आणि मराठीच राहणार”.