Sandeep Deshpande on Uddhav Thackeray and Raj Thackeray : महाराष्ट्राच्या राजकारणात मनसे आणि शिवसेना (ठाकरे) युतीच्या चर्चांनी जोर धरला आहे. मराठीच्या मुद्द्यावर या दोन पक्षांनी, अर्थात या पक्षांचे प्रमुख राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं अशी अनेकांची इच्छा आहे. राज्य सरकारने राज्यातील मराठी शाळांमध्ये हिंदी भाषा शिकणं सक्तीचं केल्यामुळे या निर्णयाला विरोध होऊ लागला आहे. परिणामी मनसे व ठाकरे गट राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात आक्रमक झाले आहेत.

दरम्यान, मराठी माणसांच्या अस्तित्त्वासाठी आमच्यातील वाद किरकोळ असल्याचं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं आहे. त्यानंतर काही वेळात उद्धव ठाकरे यांनी देखील राज ठाकरे यांना प्रतिसाद देत आपणही किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला तयार असल्याची भूमिका घेतली आहे.

“महाराष्ट्राच्या हिताच्या मुद्द्यापुरतं एकत्र येता येऊ शकतं”

पाठोपाठ, मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी देखील सूचक वक्तव्य केलं आहे. देशपांडे म्हणाले, “महाराष्ट्रासाठी एकत्र येणं म्हणजे निवडणुकीसाठीच एकत्र यायला पाहिजे असं नाही. मराठी व महाराष्ट्राच्या हिताच्या मुद्यापुरतं सुद्धा एकत्र येता येऊ शकतं. जसे, तामिळनाडूमध्ये कावेरीच्या मुद्द्यावर तामिळ पक्ष एकत्र येतात तसंच मराठी पक्षांनी यायला काय हरकत आहे? फक्त निवडणूक हा संकुचित विचार आहे.””

…तर ती वैचारिक दरिद्रता असेल : देशपांडे

देशपांडे यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये म्हटलं आहे की “तू इतक्या जागा लढव, मी तितक्या लढवतो, तू ही जागा लढव, मी ही जागा लढवतो, तुला हे पद, मला हे पद, इतका मर्यादित विचार करून चालणार नाही. फक्त निवडणूक एवढाच विचार केला तर ती वैचारिक दरिद्रता असेल.”

दोन्ही बाजूचे लोक एकत्र येण्यास अनुकूल

दुसऱ्या बाजूला, शिवसेनेचे (ठाकरे) राज्यसभेचे खासदार संजय राऊत म्हणाले, “काही लोकांना दोन्ही भाऊ किंवा समविचारी पक्ष एकत्र आलेले नको असतात. त्यामुळे ते लोक वेगवेगळे काटे मारत असतात. राज ठाकरे यांनी एक विषय मांडला, जो महाराष्ट्राच्या हिताचा विचार होता. राज ठाकरे यांनी विषय मांडल्यानंतर त्यानंतर लगेच काही क्षणात उद्धव ठाकरे यांनी देखील प्रतिसाद दिला. तो प्रतिसाद देखील महाराष्ट्राच्या हिताचा होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उद्धव ठाकरेंनी अटी-शर्थी ठेवल्या?

दरम्यान, संजय राऊत यांना विचारण्यात आलं की उद्धव ठाकरे यांनी काही अटी-शर्थी ठेवल्या आहेत का? यावर राऊत म्हणाले, “राज ठाकरे यांनी विचार मांडला, उद्धव ठाकरे यांनी प्रतिसाद दिला, यात अटी-शर्थी आल्या का? तर नाही आल्या. मला सांगा, यात कोणती अट आणि कोणती शर्त आहे? जर दोन पक्षांचे नेते जे भाऊ आहेत, ते महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येण्याच्या विषयांवर सहमती होत असेल तर त्यात जास्त वादविवाद करणं हिताचं नाही, मी याच मताचा आहे”.