सांगली : भावी पिढी जबाबदार नागरिक बनण्याबरोबरच आरोग्यसंपन्न बनावी यासाठी सुरू असलेल्या सरकारच्या नशामुक्त अभियानाला तरुणांनी सक्रिय प्रतिसाद द्यावा, असे आवाहन अभिनेते सयाजी शिंदे यांनी मिरजेत केले.

मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या पथकाने नशेखोरीविरुद्ध अभियान हाती घेतले असून, नशेचे मूळ संपुष्टात आणण्यासाठी विशेष कामगिरी केली आहे. या कामगिरीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही कौतुक केले असून, आज अभिनेते शिंदे यांनी ठाण्याचे प्रभारी सहायक निरीक्षक सतीश शिंदे यांच्यासह या पथकातील सहभागी पोलीस बांधवांचे कौतुक केले. या वेळी त्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारात वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षण करणे प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे सांगितले. या वेळी ‘माझी मुलगी माझा अभिमान’ ही संकल्पना राबविणारे अधिकारी श्री. शिंदे यांच्यासह मुलगी तनिष्का हिचेही कौतुक त्यांनी केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तसेच, अभिनेते शिंदे यांनी मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात मिळणारी सेवा गरीब रुग्णांसाठी मोलाची ठरत असल्याचे सांगितले. तसेच रुग्णालयातील मॉड्युलर अतिदक्षता विभाग आणि शस्त्रक्रियागाराची पाहणी करून समाधान व्यक्त केले. वैद्यकीय अधीक्षक डॉ. रुपेश शिंदे यांनी रुग्णालयामध्ये मिळणारी सेवा आणि उपचार याची माहिती दिली. तसेच, जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मिरज रुग्णालयामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. डॉ. शिंदे यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरजच्या वतीने एक हजार वृक्ष दुष्काळी भागास देण्यात येणार असल्याचे या वेळी सांगितले. या वेळी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव यांच्यासह निवासी डॉक्टर, परिचारिका, विद्यार्थी उपस्थित होते.