संगमनेर : गावठी कट्टा बाळगणाऱ्या दोघा तरुणांना संगमनेर शहर पोलिसांनी शिताफीने अटक केली. त्यांच्याकडून सुमारे ५० हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तूल आणि मोबाइल फोन ताब्यात घेण्यात आला. ही कारवाई महात्मा फुले विद्यालयाकडून घुलेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर करण्यात आली. न्यायालयाने त्यांना ३१ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
शेख मुजम्मील शेख मजिद (वय २२, रा. ता. खामगाव, जि. बुलढाणा) आणि जमीरखान नजीरखान (वय ४०, रा. मिलन कॉलनी, ता. खामगाव, जि. बुलढाणा) अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, काल, गुरुवारी रात्री १ वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी महात्मा फुले शाळा ते घुलेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर सापळा रचला. त्या वेळी अंधारात संशयास्पद स्थितीत फिरताना दिसलेल्या दोन व्यक्तींना ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली असता, त्यांच्याकडे गावठी पिस्तूल आणि मोबाईल आढळून आले. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार रामकिशन मुकरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक विश्वास भान्सी, पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब लोखंडे, रामकिशन मुकरे, अतुल दिनकर उंडे, अजित बाळू कुन्हे, संतोष सोपान बाचकर आणि साईनाथ रामदास पवार यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विश्वास भान्सी करत आहेत.